राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 21 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे जाणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर श
.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारणही चांगलेच तापले आहे. संसद आणि नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उचलण्यात आला. या घटनेवरून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. संतोष देशमुख यांच्य मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीय आणि विरोधकांकडून केली जात आहे.
शरद पवार पोलिस तपासचा घेणार आढावा संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद हे आता बीडला जाणार आहेत. शरद पवार सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहे. 20 डिसेंबर रोजी अधिवेशन संपल्यानंतर 21 डिसेंबर रोजी शरद पवार मस्साजोग गावात जाणार आहेत. याठिकाणी ते मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्याचबरोबर पोलिस तपासाला गती यावी आणि अन्य परिस्थितीचा आढावा घेतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारीच मस्साजोग येथे जाऊन कुटुंबियांची विचारपूस केली होती.
आतापर्यंत चौघांना अटक, 3 आरोपी फरार सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा 4 वर पोहोचला आहे. विष्णू चाटेवर हत्या व खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अद्याप 3 आरोपी फरार आहेत. या प्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे व विष्णू चाटे या 7 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल दुसरीकडे, संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गुरुवारी एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याची केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेट घेताना दिसून येत आहेत. राजेश पाटील यांना 4 दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.
संसद आणि विधीमंडळातही पडसाद संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर खासदार बजरंग सोनवणे संसदेत आवाज उठवला होता. बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही, प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली होती. या प्रकरणावरून विधिमंडळातही आवाज उठवण्यात आला. आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार नमिता मुंदडा यांनी हा मुद्दा मांडला. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी या आमदारांनी केली होती.
देशमुख हत्याकांडाची पार्श्वभूमी काय? गत 6 डिसेंबर रोजी प्रतिक घुलेसह इतर काही लोकांनी मस्साजोग भागात होणाऱ्या एका खासगी कंपनीच्या प्रकल्पस्थळी येऊन सुरेश सोनवणे व प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदे यांना जबर मारहाण केली होती. त्यांच्यावर सदर कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर मस्साजोगचे रहिवाशी असणाऱ्या वॉचमन अशोक सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर 6 तारखेलाच केज पोलिस ठाण्यात घुलेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 3 दिवसांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.