छगन भुजबळांचे महायुतीविरोधात काम: म्हणून त्यांना मंत्रिपद नाकारले, शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा दावा; NCP सोडण्याचे आव्हान – Nashik News



लोकसभा व विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम केले. मी त्याचे पुरावे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही, असा दावा शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी केला. भुजबळ

.

छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेत. या प्रकरणी त्यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मला छगन भुजबळ यांची किव वाटते. त्यांनी कितीही आगपाखड केली किंवा कितीही ढोंगीपणा केला, तरी त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याची हिंमत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पक्ष व आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी.

भुजबळांना महायुतीविरोधातील गद्दारीचे फळ मिळाले

मनमाड – नांदगावचे आमदार सुहास कांदे पुढे म्हणाले, छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाले म्हणजे ते ओबीसी समुदायाला मिळते का? छगन भुजबळ हे ओबीसी समाज आहेत का? त्यांनी एकीकडे मुलाला व दुसरीकडे पुतण्याला दिले. त्यांच्या मक्तेदारीला आव्हान देणारा मी पहिला व्यक्ती आहे. त्यांनी दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघासह विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे काम केले नाही. याचे पुरावे आम्ही वरिष्ठांना दिले. त्यामुळेच त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आले हे मी आवर्जुन सांगेन.

छगन भुजबळ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. पण त्यांनी कितीही आगपाखड केली, ढोंग केले तरी ते आपला राजीनामा देणार नाहीत. त्यांना महायुतीसोबत केलेल्या गद्दारीचे फळ मिळाले आहे. भुजबळ समर्थकांनी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले. त्यांच्याविरोधात नको ते बोलले.

भुजबळांच्या मेळाव्याला एकाच जातीचे लोक

सुहास कांदे म्हणाले, मी जातपात मानत नाही. पण छगन भुजबळ यांच्या येवल्यातील मेळाव्यात विशिष्ट जातीचे लोकच दिसतील. 100 पैकी 99 जण एकाच जातीचे लोक आहेत. याच समाजाचे लोक भुजबळांना डोक्यावर उचलतात. अजित पवार हे भुजबळांना भेटण्यासाठी नाशिकला येणार असल्याच्या बातम्या भुजबळांच्या गोटातील स्थानिक पत्रकारांनी पेरल्या आहेत. अजित पवारांनी छगन भुजबळ यांना फोन केला नाही. ते भुजबळांना फोनही करणार नाहीत. त्यानंतरही भुजबळ यांच्यात पक्ष सोडण्याची हिंमत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

phvip com