केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी एक टिप्पणी केली. परंतु, ही टिप्पणी आता वादात अडकली आहे. या टिप्पणीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी – निवडणुकीनंतर आपले महापु
.
आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले असते, तर सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता, असे विधान अमित शहा यांनी केले होते. आंबेडकरांचे नाव तुम्ही 100 वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो, असेही अमित शहा म्हणाले. त्यांच्या विधानामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अमित शहा यांच्या विधानावरून भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणुकीपूर्वी – निवडणुकीनंतर आपले महापुरुष आणि देव बदलणे ही भाजपची फॅशन असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. भारतरत्न डॉ.आंबेडकर यांनी भारतात समतेचा स्वर्ग निर्माण केला, त्यामुळे आम्ही आंबेडकरांचे नाव घेतो आणि घेत राहणार, असे ते म्हणाले. सामान्य जनतेला आपले अधिकार आणि हक्क देणाऱ्या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे ही सन्मान आणि अभिमानाची गोष्ट आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
अमित शहा यांनी माफी मागावी दरम्यान, अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अमित शहा यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे, हे अमित शाह यांच्या विधानावरून कळून येते, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
राहुल गांधींनीही केला निषेध अमित शाह यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विधानाचा निषेध केला आहे. मनुस्मृतीला मानणाऱ्यांना आंबेडकरांची अडचण होत असते, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.