शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यपालांनी विद्यमान महायुती सरकारच्या शपथविधीची अधिसूचनाच काढली नसल्याचा धक्कादायक दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर जोरदार पलटवार करत त
.
भास्कर जाधव अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना म्हणाले की, या सरकारने 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वा. शपथ घेतली. साधारणतः राज्यात निवडणूक झाली की राज्यपाल सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करतात. राज्यपालांनी निमंत्रित केले नाही तर सरकार स्थापन करू इच्छिणाऱ्या पक्षाला आपल्या समर्थक आमदारांची यादी घेऊन राज्यपालांना भेटावे लागते. त्यांना आम्ही सरकार स्थापन करू इच्छितो, आम्हाला निमंत्रित करा असे सांगावे लागते.
त्यानंतर राज्यपालांनी शपथविधीची तारीख जाहीर करायची असते. नव्या सरकारचा अमूक दिवशी, अमूक वेळी शपथविधी होईल अशी अधिसूचना काढावी लागते. त्यातही शपथविधीचे स्थान बदलायचे असेल तर तशी विनंती राज्यपालांना करावी लागते.
राज्यपालांनी तुम्हाला केव्हा बोलावले?
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे असे मानले जाते. मी टीका करत नाही, पण आपण घटनेचे महत्त्व किती किमी करत आहोत? राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे की नाही? हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रत्युत्तरात स्पष्ट करावे. राज्यपालांनी तुम्हाला केव्हा बोलावले? तुम्ही राज्यपालांकडे यादी घेऊन कधी गेलात? हे महाराष्ट्राला सांगावे. तुम्ही राज्यपाल महोदयांकडे गेला नाहीत अशी माझी माहिती आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.
ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची 4 डिसेंबर 2024 रोजी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांकडे गेले. त्यांनी दावा सादर केला. पण आझाद मैदानावर त्यापूर्वीच शपथविधी सोहळ्याच्या मंडपाचे काम सुरू झाले होते. मग तिथे शपथविधी घ्यायचा हे कुणी ठरवले? राज्यपाल हे घटनात्मक पद असेल तर त्याचा अधिकार काय? हा माझा धोरणात्मक प्रश्न आहे.
राज्यपालांना किती गृहित धरावे?
22 मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या दौऱ्याच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतरही राज्यपालांनी शपथविधीची अधिसूचना काढली नाही. राज्यपालांना किती गृहित धरावे? राज्यपाल कुठल्यातरी एका पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाचा मानसन्मान राखला पाहिजे. या पदाचे महत्त्व राखण्याचे भान राज्यपालांना आहे की नाही? असा सवाल भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.
भातखळकरांनी घेतला आक्षेप
भास्कर जाधव यांच्या या विधानावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरद्वारे आक्षेप घेतला. भास्कर जाधव हे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत आहेत की? ते वैफल्यग्रस्त झालेत? यावर मी बोलणार नाही. पण राज्यपाल हे एका पक्षाचे आहेत, हे त्यांचे वाक्य रेकॉर्डवरून काढून टाकले जावे, असे ते म्हणाले.
विखे पाटलांनीही केला हस्तक्षेप
त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. अध्यक्षांच्या निर्णयानंतरही विरोधी पक्षांचा आक्षेप कळत नाही. ते एवढे वैफल्यग्रस्त झालेत की अध्यक्ष बोलत आहेत याचे भानही त्यांना राहिले नाही. राज्यपालांवर आक्षेप घेणे अत्यंत चुकीचे कृत्य आहे. सर्वांनी सभागृहाच्या परंपरा जपल्या पाहिजेत. नव्या सदस्यांना प्रथा परंपरा माहिती नसतात. पण भास्कर जाधव हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी सभागृहाची प्रतिमा जपली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर त्यांची व भास्कर जाधवांसोबत शाब्दिक चकमक झाली. राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनीही या प्रकरणी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांचे काही आक्षेपार्ह वाक्य कामकाजातून वगळण्याची मागणी केली.