काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी महायुती सरकार सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांत मलाईदार खात्यांसाठी भांडण सुरू झाल्याचा आरोप केला. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व त्यांच्या हातातील संविधानाची विटंबना झाली. काँग्रेसने सरक
.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर उसळलेल्या हिंसाचारावर भाष्य केले. ते म्हणाले की, हे सरकार लोकांनी विरोध केला की त्यांना बेदम मारते. मनुष्य हा जनावरांसारखा आहे असे कृत्य परभणीत घडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व त्यांच्या हातातील संविधानाच्या झालेल्या विटंबनेचा काँग्रेसने सुरुवातीलाच निषेध केला. तसेच शासनाला या घटनेची तातडीने दखल घेण्याची विनंती केली. पण त्यानंतरही तिघांच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.
हे सरकार मलाईदार खात्यांसाठी आपसातच भांडण करण्यात व्यस्त आहे. मलाईदार खाते कुणाला मिळतात? यावर त्यांचे काम सुरू आहे. त्यांच्या निर्देशानुसारच पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांवर लाठीमार केला. त्यामुळे या प्रकरणी परभणीच्या पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
हक्कांची मागणी केली तर जनतेला मारहाण
नाना पटोले पुढे म्हणाले, सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात परभणीच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले जाईल. लोकांनी आपल्या हक्कांची मागणी केली तर त्यांना बेदम मारले जाईल असा संदेश सरकारने परभणीच्या घटनेवरून दिला आहे. पण काँग्रेस या महाराष्ट्रात ही बेबंदशाही व हिटलरशाही अजिबात चालू देणार नाही. कारण, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाच्या विद्यमान दयनीय स्थितीविषयी केलेल्या विधानावरही नाना पटोले यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीचे जे काही निकाल आलेत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला जबर धक्का बसला आहे. जनता या धक्क्यातून अजूनही सावरली नाही. त्यामुळे राज्यातील विविध गावांत ईव्हीएमवर नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठराव पारित होत आहेत. लोक आपण दिलेले मतदान कुठे गेले? हे शोधण्याचे काम करत आहेत. पण हे सरकार लोकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरही घाला घालण्याचे काम करत आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे की, विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कोणतीही लाट नव्हती असे विधान केले आहे.
भाजपमध्येही अनेकजण मोदींवर आक्षेप घेतात
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली. याविषयी बोलताना पटोले म्हणाले की, राजकीय पक्षात सर्वच गोष्टी चालतात. भाजपमध्येही काही लोक नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेप घेतात. त्यामुळे हे प्रकार केवळ काँग्रेसमध्येच होतात असे नाही. पण पक्षातल्या गोष्टी माध्यमांपुढे नव्हे तर पक्षाच्या व्यासपीठावरच मांडणे योग्य असते.
पराभव श्रेयवादाचा नव्हे तर आत्मचिंतनाचा विषय
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षांपासून सर्वचजण सहभागी झाले होते. तिकीट वाटप, प्रचार आदी सर्वच कामांत त्यांचा सहभाग होता. त्यामुळे पराभवाची जबाबदारी सर्वांचीच आहे. या प्रकरणी श्रेय व श्रेयवादाचा विषय नाही. हा एकप्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने ईव्हीएमविरोधात सुरू केलेल्या लढाईवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कारण ही जनभावना आहे. काल आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही संसदेत संविधानावर चर्चा सुरू असताना संविधान व लोकशाही वाचवायची असेल तर या देशात मतपत्रिकेवरच मतदान घेण्याची मागणी केली, असे नाना पटोले म्हणाले.