राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दिसून आलेल्या दोन बिबट्या पैकी, एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी जेरबंद झाला. जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी निसर्गात मुक्त करण्यात येणार आहे.
.
वांबोरी येथे राहुरी रस्त्याजवळ देविदास जवरे यांच्या अंगणात भक्ष्याला घेऊन जाताना दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. ही घटना गुरुवारी (१२ डिसेंबर) उघडकीस आली. तत्पूर्वी बुधवारी रात्रीच बिबट्या आढळून आल्याची चर्चा गावभर पसरली होती. शिंगवे रोड परिसरातही फटाक्यांची आतिषबाजी करत बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला होता. परिसरातील कुत्रे गायब झाले होते. जवरे यांच्या घराशेजारील मकाच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आले. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन पिकांना पाणी देणे तसेच विद्यार्थ्यांना क्लासेस व शाळेत जाणे देखील अवघड झाले होते.
दिव्य मराठीने या प्रश्नाकडे लक्षवेधल्यानंतर शुक्रवारी (१३ डिसेंबर) वन विभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला. शनिवारी सकाळी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जेरबंद बिबट्याला वनविभागाने दुसऱ्या पिंजऱ्यात स्थलांतरित करून निसर्गात मुक्त करण्यासाठी वांबोरी येथून रवाना केले. तसेच दुसरा बिबट्या जेरबंद करण्यासाठी पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावला.
