शिंदे – पवारांनी आपापल्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांना सोपवली: भावी मंत्र्यांना CM देवेंद्र फडणवीस स्वतः आज दुपारनंतर करणार फोन – Mumbai News



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होणार आहे. यासाठी संभाव्य मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस फोन करणार आहेत. यामुळे आता कुणाकुणाला फोन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची नावे अंतिम करून ती मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविली असल्याची माहिती आहे. तर अजित पवार यांनी देखील आपल्या मंत्र्यांची यादी फायनल करत मुख्यमंत्री फडणवीसांना सोपवली आहे.

शिंदेंना नगरविकास खातं मिळण्याची शक्यता

एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खाते कायम राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांनी नगरविकास स्वत:कडे ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी हे खाते स्वत:कडे न ठेवता शिंदेंना दिले होते. यातून त्यांनी प्रत्येक आमदारांना मोठा निधी दिला होता.

गेल्या सरकारमध्ये अजित पवार गटाकडे असलेले सहकार खातेही भाजप या वेळी आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेे. त्यावरून भाजप व पवार गटातही धुसफूस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन फडणवीसांशी चर्चा केली. भाजपच्या हायकमांडने या वेळी तिन्ही पक्षांच्या मंत्रिपदांसाठी निकष ठरवून दिले आहेत. त्यामुळे शिंदेंच्या निकटवर्तीय काही मंत्र्यांची नावे कापली जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीत जुन्या 5 मंत्र्यांसह झिरवाळ, भरणेंची नावे चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील या विद्यमान मंत्र्यांची नावे कायम राहतील. दिलीप वळसे पाटील यांनी आधीच नकार कळवला आहे तर हसन मुश्रीफ यांचा पत्ता कट केला जाऊ शकतो. नरहरी झिरवाळ, दत्ता भरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

शिंदेसेनेकडून गोगावले, शिरसाट, खोतकरांना मिळू शकते संधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील उदय सामंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील ही नावे कायम ठेवली आहेत. तर प्रवक्ते संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत दिलेत. संजय राठोड, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या नावावर शंका आहे.

भाजपकडून मुंडे, मुंनगंटीवारांसह पाटलांना संधी

भाजपच्या विधिमंडळ बैठकीत गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणाऱ्या बहुतांश नेत्यांना पहिल्या यादीत स्थान मिळणार असल्याचे सांगण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांची नावे मंत्रिमंडळाच्या यादीत अग्रक्रमांकावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यातील दुसऱ्या महिला मेघना बोर्डीकर, लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर, डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, परिणय फुके व संजय कुटे यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भाजपने काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना जुन्यांचा पत्त कट करण्याचे ठरवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24