अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बसस्थानकात एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झाल्याने एसटी बस थेट बसस्थानकात घुसली आणि बसस्थानकात बसलेल्या दोन व्यक्तींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
.
अपघातग्रस्त बस पारनेरहून मुंबईकडे जाणारी होती. ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रित होऊन थेट स्थानकात शिरली. या दुर्घटनेत दोन व्यक्ति गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे एसटी बसच्या व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अपघाताची चौकशी सुरू असून या प्रकरणावर लवकरच कारवाई केली जाईल.
सुपा पवारवाडीतील घाटात कंटेनरचा अपघात अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सोमवारी रात्री सुपा येथील पवारवाडी जवळ कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने अपघातात दोन जण जखमी झाले. सोमवारी रात्री 9च्या सुमारास कंटेनर क्रमांक एमएच 14 सीई 2978 हा अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सुपा पवारवाडीतील घाटात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. त्याचवेळी पलटी झालेला कंटेनर एका कारवर आदळून रस्त्यावर आडवा झाला. या अपघातावेळी कंटेनरमध्ये चार व्यक्ती होते. यातील दोघे गंभिर जखमी झाले.
या अपघातामुळे अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी, महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे अंमलदार वेठेकर आणि अमोल धामणे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले. सुपा पोलिस आणि पवारवाडीच्या युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले आणि वाहतूक पूर्ववत सुरू केली.