पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या महिलेची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशन संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असल्याने संशयितानं डोक्यात हातोड्याचे घाव घालून
.
मृतदेह खंबाटकी घाटात आणून टाकल्यानंर दोन दिवसांनी संशयितानेच तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती. जयश्री विनय मोरे (रा. राजमुद्रा पेट्रोल पंपाशेजारी, मारूंजी, ता. मुळशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
ट्रकचालकाला दरीत दिसला मृतदेह
खंबाटकी घाटात बंद पडलेल्या मालट्रकच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलावून चालक दरीकडेला उभा असताना त्याला दरीत एका महिलेचा मृतदेह दिसला. त्याने खंडाळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह दरीतून वर काढला. मृत महिलेचे वय अदाजे २७ वर्ष होते. तसेच डोक्यात लोखंडी वस्तुने पाच-सहा घाव घालण्यात आल्याचे आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने धागेदोरे मिळवायला सुरूवात केली.
आरोपीसोबत लिव्ह-इन मध्ये होती महिला
पोलिसांनी मिसिंग व्यक्तींची माहिती घेतली असता पुण्यातील वाकड हद्दीतून एक महिला बेपत्ता असल्याचे समजले. त्या बेपत्ता महिलेले वर्णन मृत महिलेशी जुळले. मृत महिला ही संशयित आरोपी दीनेश पोपट ठोंबरे याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. संशयितानेच पोलिस ठाण्यात तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती.
खंबाटकी घाटात मृतदेह आढळल्यानंतर फलटणचे डीवायएसपी राहुल धस, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर, खंडाळ्याचे पोलिस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष म्हस्के यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासात मृत महिलेची माहिती मिळवली.
हातोड्याचे घाव घालून केली हत्या
जयश्री मोरे ही चार वर्षांपासून संशयित दीनेश ठोंबरे याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याला सोडून ती आई-वडीलांसोबत राहायला जाणार होती. त्यामुळे तो चिडून होता. २४ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने तिला बोलावून घेतले. कारमधून तिला बाहेर घेऊन गेला. कारमध्येच त्याने हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केली. तसाच तो खंबाटाकी घाटात आला. मृतदेह दरीत टाकून मध्यरात्री पुण्याला गेला.
काही तासात लावला गुन्ह्याचा छडा
मृत महिलेच्या ३ वर्षाच्या मुलाला संशयिताने आळंदीत बेवारस स्थितीत सोडून दिले. सुदैवाने पोलिसांनी त्याच्या आजोबांचा पत्ता शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. मुलाला आजोबांच्या ताब्यात दिले. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयिताला कळली. त्यानंतर मंगळवारी संशयित दीनेश ठोंबरे याने वाकड पोलिसांत जयश्री मोरेच्या मिसिंगची तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी काही तासात या गुन्ह्याचा छडा लावला.