लाडकी बहीण योजनेमुळे महायुती जिंकली? संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले….


Sanjay Raut on Ladki Bahin Yojna: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. महायुतीला लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) फायदा झाला असं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र यावर असहमत आहेत. निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी असे काय दिवे लावले आहेत, की त्यांना 120 च्या वर जागा मिळत आहेत अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा इतका मोठा विजय झाला असावा यावर संजय राऊत म्हणाले, “मला असं वाटत नाही. महाराष्ट्रात लाडके भाऊ, लाडके मामा, लाडके काका, लाडके आजोबा, लाडके दादा नाहीयेत का? मी परत सांगतो की, ही मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानींचं बारीक लक्ष होतं. काल अटक वॉरंट निघाल्यानंतर असा निकाल लागेल अशी आमच्या मनात शंका होती. अमेरिकेत अदानींवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भाजपावरच होते. या निवडणुकीत सर्वात जास्त पैशांचा वापर, ताकद अदानींनी केला. या निकालावर गौतम अदानींचा प्रभाव आहे का? कारण मोदी, फडणवीस, शिंदे आणि अदानी हे वेगळे नाहीत”. 

“जो निकाल दिसत आहे त्यावरुन माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला तो म्हणजे काहीतरी गडबड आहे. एकनाथ शिंदे यांना 56 जागा कोणत्या भरवशावर मिळत आहेत. अजित पवारांना 40 च्या वर जागा मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी असे काय दिवे लावले आहेत, की त्यांना 120 च्या वर जागा मिळत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण, कल ज्या प्रकारे होता ते पाहता हा लोकशाहीचा कौल वाटत नाही. हा मान्य कसा करावा असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाही पडला असेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“शरद पवारांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. त्यांना तुम्ही 10 जागा देण्यासही तयार नाही. नेमकी अशी काय गडबड महाराष्ट्रात आहे. हा निकाल जनतेचा कौल आहे हे मानण्यास आम्ही तयार नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतं, आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही. पण लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास बसू शकत नाही,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “पैशांचा वापर झाला आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात? ज्यांच्या गद्दारी, बेईमानीविरोधात महाराष्ट्रात रोष आहे त्या अजित पवारांना इतक्या जागा कशा? शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता”. 

“लोकसभेच्या निकालातही गडबड झाली होती. अन्यथा नरेंद्र मोदींचा पराभव झाला असता. निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही. आमच्या महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर अमित शाह, नरेंद्र मोदी आणि अदानी यांनी हा निकाल ठरवून लावला आहे,” असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.  महाराष्ट्रात गौतम अदानी जिंकलेत हे दाखवायचं आहे असा आरोपही त्यांनी केला. 

मुंबई विकायला काढण्याचा डाव असून, आमचा त्याला विरोध आहे. आमचा विरोध मोडून काढण्यासाठी हे निकाल लावून घेतलेले आहेत. महाराष्ट्रात असे निकाल कधी लागूच शकत नाहीत असं संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही गाफील नव्हतो, मात्र हा जनतेचा कौल नाही. हा अदानी आणि त्यांच्या टोळीने लावून घेतलेला कौल आहे असंही ते म्हणाले. एकनाथ शिदेंना 20 च्या वर जागा मिळणार नाही असा भाजपाचाही अंदाज होता. भाजपा 65 ते 70 जागा जिंकेल असा अंदाज होता असंही संजय राऊत म्हणाले. पण यंत्रणाच ताब्यात घेतल्या आहेत असंही राऊतांनी सांगितलं. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24