शिंदेंसोबतचे ‘ते’ २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण…; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट



मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची रिघ वाढली आहे. त्यात शरद पवारांना सोडून गेलेले अनेक आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतत आहेत. मात्र ठाकरेंना सोडून गेलेले आमदार पुन्हा पक्षात घेणार का याबाबत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केले आहे. आमची लढाई ही महाराष्ट्रासाठी आहे, आम्ही स्वत:साठी लढत नाही. टेबलावर नाचणारे जे दृश्य पाहिले तर त्याची घाण वाटते असं सांगत आदित्य यांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांसाठी परतीचे दरवाजे बंद असल्याचं संकेत दिलेत. 

शिंदे गटातील कुणी परत संपर्कात आहे का अशा प्रश्न लोकमतच्या मुलाखतीत आदित्य यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या कठीण काळात सोडून जाणारी व्यक्ती माणुसकीचा धर्म पाळू शकते का हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला, इतकेच नाही तर तुम्ही महाराष्ट्र विकला, महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही परत घेऊ शकतो का हा मोठा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय आज जे २-४ मोठे नेते परतण्याच्या मनस्थितीत आहेत त्यांनी संपर्क केला असता उद्धव ठाकरेंनी तुम्हाला कसं घेणार असं विचारलं. काही जण इथून तिथून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायेत. राजकीय दृष्ट्‍या ठीक, कदाचित ती जागा आम्ही परत जिंकू. परंतु महाराष्ट्राची जी संस्कृती होती ती तुम्ही मोडली. ज्यारितीने टेबलावर चढून ते नाचलेत, मला कधी विचित्र वाटायला लागलं की या लोकांच्या प्रचाराला आम्ही गेलो होतो, यांच्या बाजूला बसलो होतो, याची घाण वाटायला लागली. टेबलावर नाचणारे दृश्य हे जगाने पाहिले असं सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे समर्थक आमदारांवर घणाघात केला.

दरम्यान, नवीन पक्ष, नवीन चिन्ह आमच्याकडे असेल. माझ्या आजोबांचा चेहरा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ते वापरतात. काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचे म्हणून त्या लोकांना मतदान झालंय. आम्ही जे लढतोय ते महाराष्ट्रासाठी, स्वत:साठी नाही. उमेदवार निवडताना आमचा निकष एकच आहे जो महाराष्ट्र हिताचं बोलेल. स्वार्थ किती पाहणार आहात…? असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

या मुलाखतीत अमित ठाकरे जर निवडणुकीत उभे राहिले तर तुम्ही उमेदवार देणार नाही अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, जर, तर च्या अफवा आम्ही ऐकतोय. आज मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची, इच्छुकांची गर्दी गेल्या दीड महिन्यापासून आहे. पक्षप्रवेश सुरू आहेत. उद्धव ठाकरे रोज भेटतायेत, मीदेखील भेटतोय. कोण कुठून लढणार, कुणाच्या विरोधात लढणार हे माहिती नाही. माझ्यासमोर कुणीही लढू द्या. मी ५ वर्ष काम केलंय, लोकांमध्ये होतो, कुणाला लढायला न सांगणे म्हणजे हे माझे अपयश आहे. जर तर यावर मी बोलणार नाही, कारण हा मोठा निर्णय आहे. पण ही लढाई आमची दिल्लीतील हुकुमशाहाविरोधात आहे असं सांगत आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंवरील प्रश्नाला उत्तर देणे टाळले.  
 

Web Title: Maharashtra Election 2024 – Will Uddhav Thackeray take the MLAs who went with Eknath Shinde back to the party, Aditya Thackeray gave a clear answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24