काँग्रेसची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिली. महाविकास आघाडीचे जागावाटपही उद्याच होणार असल्याचे ते म्हणाले.
.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होईल. तत्पूर्वी, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ अद्याप संपला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेस व मित्रपक्षाच्या 12 जागांवर दावा केल्यामुळे हा घोळ लांबला आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या निकाली निघणार असल्याचा दावा केला आहे.
माध्यमांनी आमच्यात भांडण लावू नये
नाना पटोले म्हणाले, विदर्भातील जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. माध्यमांनी उगीच आमच्यात भांडण लावू नये. मंगळवार सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे जागावाटप जाहीर होईल. आम्ही मेरीटच्या आधारावर उमेदवार देऊ. काँग्रेसची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होईल. शरद पवारांनी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला फोन केला नाही. आम्ही कालपासून दिल्लीत आहोत.
काँग्रेसचे बडे नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच्या बैठकीत महाराष्ट्रातील जागावाटपातील नाराजीच्या मुद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेसचे सर्वच बडे नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा यात समावेश आहे. आमचा शिवसेन ठाकरे पक्षाशी कोणताही वाद नाही. ज्या थोड्याफार जागांवर तिढा आहे, तो ही लवकरच संपुष्टात येईल, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, नाना पटोले यांनी यावेळी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केलेल्या कौतुकावरही भाष्य केले. प्रत्येक नेत्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांनी काय बोलावे व काय बोलू नये हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा…
सरन्यायाधीश चंद्रचूड हे विष्णूचे 14 वे अवतार:त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्यास तयार; खासदार संजय राऊत यांची खोचक टीका
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना साक्षात्कार होत असेल. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घरी गणपतीच्या आरतीला बोलवले होते. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचा निकाल देऊ नका, अशी ईश्वराची आजबात अजिबात इच्छा नसेल. सरन्यायाधीशांना विष्णूच्या तेराव्या अवताराने शिवसेनेचा निकाल विधानसभा निवडणुका देऊ नका, असा साक्षातकार दिला असेल. सरन्यायाधीश हे विष्णूचे चौदावे अवतार असू शकतात. तसे असेल तर मी त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्यास तयार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर