अभ्यासाचे धडे गिरवता गिरवता शाळेच्या आवारातील परसबागेत विद्यार्थी कोथिंबीर, पालक भाजी, कारल्याचे पीक घेत त्यातून ते आर्थिक व्यवहाराचे धडे गिरवत आहेत. हे चित्र आहे कधी काळी पारधी बेडा म्हणून आेळखल्या जाणाऱ्या तिवसा तालुक्यातील व कुऱ्हा परिसरातील काळा
.

अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत तिवसा पंचायत समिती अंतर्गत मारडा केंद्रामधील पारधी समाजाची वस्ती असलेल्या काळा गोटा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला कुऱ्हा येथील बाजारात शुक्रवारी विकायला आणला होता.
जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या परसबागेतील भाजीपाला बाजारात विद्यार्थी विक्री करत असल्याने नागरिकांची विद्यार्थ्यांच्या स्टॉलभोवती गर्दी झाली होती. नागरिकांनी आनंदाने व उत्सुकतेने पालक, कोथिंबीर, कारले विद्यार्थ्यांकडून विकत घेतले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
शाळेतील विजयश्री पवार, सौरभ पवार, अर्चना पवार, अनेश पवार, चंचल पवार, प्रशांत चव्हाण हे विद्यार्थी मुख्याध्यापक नितीन पचलोरे व शिक्षक प्रवीण खैरकर यांच्यासोबत होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, व्यवहार चातुर्य, सभाधिटपणा, बाजारपेठेची माहिती आदी गुणांची रुजवण होण्यास मदत होईल, असा विश्वास या प्रसंगी शिक्षकांनी व्यक्त केला, तसेच शाळेतील परसबागेत पिकवलेला भाजीपाला विकून आलेल्या पैशातून बियाणे व विद्यार्थ्यांना लागणाऱ्या लेखन साहित्याचा खर्च भागवला जाईल, असेही शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसह पालकांनी व्यक्त केला आनंद : पावसाळ्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने परसबागेत ही पिके घेतली. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना भाजी कशी पिकते, बाजारात विकण्यासाठी काय करावे लागते, जुड्या बांधणे म्हणजे काय, खत काय असते याची माहिती मिळाली. त्यातून त्यांना व्यवहारज्ञान मिळत असल्याचे विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये होईल व्यावहारिक ज्ञानाची रुजुवात ^या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, व्यवहार चातुर्य, सभाधिटपणा, बाजारपेठेची माहिती आदी गुणांची रुजवण होण्यासाठी, तसेच व्यावहारीक ज्ञान मिळवण्यास मदत होणार आहे. -नितीन पचलोरे, मुख्याध्यापक , जि. प. प्रा. म. शाळा, काळागोटा.