गोदिंयामध्ये वाहन चालकाची मालकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उसने पैसे परत न केल्याने आणि कामावर न आल्याने कुटुंबियांच्या मदतीने खून करत मृतदेह जंगलात पुरला. मात्र, पानटपरीवर झालेल्या चर्चेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शांतनू पशिने हा विक्रम बैस याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. त्याने विक्रम बैसकडून 80 हजार रुपये उधारी घेतले होते. कामावरसुद्धा येत नव्हता. त्यामुळे विक्रम बैस याने पत्नी, मुलगा व त्याच्या साथीदारांच्या मदतीने शांतनूला गौतमनगर स्मशानभूमीस्थित झुडपी जंगल परिसरात नेऊन लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जीव गेल्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झुडपी जंगलात पाच फुट खोल खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला.
अन् मृतदेहाची ओळख पटली
मागील काही दिवसांमध्ये 6 ते 7 जणांनी एका युवकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरला आहे, अशी चर्चा सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम थेर यांच्यामार्फत ठाणेदार किशोर पर्वते यांना दिली. यावर ठाणेदार पर्वते यांनी पोलिस ताफ्यासह गुप्तरित्या पूर्ण परिसर पिंजून काढला. यानंतर पोलिसांनी गौतमनगर येथील स्मशानभूमीलगतचा झुडपी जंगल पिंजून काढला. या ठिकाणी एक मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर सदर मृतदेह खड्ड्याबाहेर काढला. मृताचा फोटो परीसरातील लोकांना दाखविला असता त्यातील काही जणांनी सदर मृतदेह शांतनू पशिने याचा असल्याचे आणि तो विक्रम बैस (रा. गौतमनगर) याचा वाहन चालक असल्याचे ओळखले.
बैस कुटुंब फरार
पोलिसांनी तपासची चक्रे फिरवली आणि बैस याच्याबाबत चौकशी केली असता तो आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार असल्याचे आढळून आले. तसेच विक्रम बैससोबत राहणारे अन्य तीन ते चारजणसुद्धा फरार असल्याचे चौकशीत दिसून आले. या प्रकरणी ठाणेदार किशोर पर्वते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.