हिंगोली येथील रामलिला मैदानावर कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे गुरुवारी ता. 3 रात्री जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले असून ऐतिहासिक दसरा महोत्सवाला सुरवात झाली आहे.
.
हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव म्हणून प्रसिध्द आहे. कृषी व औद्योगिक प्रदर्शनी व रामलिला कार्यक्रमासह विजयादशमीच्या दिवशी 51 फुटी रावण दहन कार्यक्रम या दसरा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. यावर्षी मध्यप्रदेशातील सतना येथील रामकुमार पांडे व कलासंच रामलिला कार्यक्रम सादर करीत आहेत.
हिंगोलीत गुरुवारी ता. 3 दुपारी सायंकाळी हनुमान मुर्तीची मिरवणुक काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली मिरवणुक रामलिला मैदानावर विसर्जित करण्यात आली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, मधुकर खंडागळे, गणेश साहु, विश्वास नायक यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, दसरा महोत्सवाला सुरवात झाली असून या कृषी व औद्योगिक प्रदर्शनीमध्ये विविध संसारोपयोगी साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच खवय्यांसाठी 10 स्टॉल असून आकाश पाळणे, टाेेराटोरा यासह इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. दसरा महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस बंदोबस्त, चिडीमार पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, दसरा महोत्सवात मध्यप्रदेशातील कलावंत रामलिला नाटीका सादर करीत असून दररोज रात्री सात ते 10 यावेळेत रामलिला सादर होत आहे. त्यानंतर शनिवारी ता. 12 रात्री 10 वाजून 41 मिनीटांनी रामलिला मैदानावर रामलिला कार्यक्रमात राम –रावण युध्द होऊन रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. रविावरी ता. 13 दुपारी चार वाजता भरतभेट होऊन रामलिला कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे समितीच्या सुत्रांनी सांगितले.