फेसबुकवर भाजप नेत्याविषयी केलेल्या एका कथित वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका कार्यकर्त्याची बोटे छाटल्याची भयंकर घटना नांदेडच्या लोह्यात घडली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या
.
विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर स्थिती अतिशय संवेदनशील बनली आहे. यामुळे किरकोळ कारणांवरुन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद उद्भवत आहेत. त्याची प्रचिती नांदेडच्या लोहा तालुक्यात आली आहे. लोह्याचे ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे भाजप कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट वडवळे यांची बोटेच छाटून टाकली.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, भाजप पदाधिकाऱ्यांनी संतोष नांदेड शहरापासून जवळच असलेल्या तुप्पा शिवारातील एका धाब्यावरून संतोष वडवळे यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी वडवळे यांची 2 बोटे छाटून टाकली. या हल्ल्याची माहिती मिळताच वडवळे यांचे कुटुंबीय व ठाकरे गटाच्या त्यांना लगतच्या एका रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आणि हो, मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब ठेवला जाईल
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. देवेंद्र जी, तुमच्या या चेल्यांना आवरा. एखाद्या सोशल मीडिया पोस्ट वरून अशी मारहाण करणे कोणत्या बौध्दिकात शिकवले जाते?
आणि हो, मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब ठेवला जाईल आणि योग्यवेळी तो सेटल पण केला जाईल. तुमचे कार्यकर्ते नांदेड आणि इथले लोक आपली जागिर समजत असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात हिंडत आहेत, असे दानवे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
आता पाहू काय आहे प्रकरण?
लोहा येथील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी नांदेडचे पार्सल चिखलीला आले आणि लोह्याचे पार्सल आता चिखलीला पाठवायचंय, असे नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट भाजपचे स्थानिक नेते तथा माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना उद्देशून असल्याचे सांगितले जात आहे. पोस्टमुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.