पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या चैतन्य महाराज वाडेकर यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर खासगी जागेतील रस्ता व सुरक्षा भिंत जेसीबीच्या मदतीने उखडल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या या कारवाईत त्यांच्या समर्थकांत खळबळ माजली आहे.
.
चैतन्य महाराज वाडेकर आपल्या कुटुंबासह चाकण एमआयडीसी परिसरात राहतात. तिथे जागेच्या मुद्यावरून त्यांचा एका बिल्डरशी वाद झाला होता. सदर बिल्डरने वाडेकर यांच्या घरालगतची जागा विकसित केली आहे. तसेच तिथे एक कंपनी स्थापन केली आहे. वाडेकर यांनी या बिल्डरवर आपली जागा हडपल्याचा व आपल्या खासगी जागेतून रस्ता बांधण्यासह तिथे कम्पाउंड बांधल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी वाडेकर कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करण्याची मागणी केली होती. अखेर कोर्टाने वाडेकर यांच्या बाजूने निकाल देत सरकारी मोजणीचे निर्देश दिले. त्यानंतर या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तत्पूर्वीच, चैतन्य वाडेकर यांनी आपले भाऊ व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जेसीबी बोलावून रात्रीतूनच कंपनीकडे जाणारा रस्ता उखडून टाकला व सुरक्षा भिंतही पाडून टाकली.
चैतन्य वाडेकर यांच्या या कृतीविरोधात बिल्डने महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वाडेकरांना पोलिस ठाण्यात बोलावले. तिथे वाडेकरांनी सरकारी कारवाईपूर्वीच आपण रस्ता उखडल्याची चूक केल्याची बाब मान्य केली नाही. पोलिसांनी त्यांना अनेकदा समजावून सांगितले. पण ते आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी कायद्याची भाषा समजावून सांगत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. पोलिसांनी या प्रकरणी चैतन्य वाडेकर यांच्यासह त्यांचे 3 भाऊ व इतर 2 सहकारी अशा एकूण 6 जणांना अटक केली आहे. तसेच घटनेतील जेसीबीही जप्त केला आहे.
कोण आहेत चैतन्य महाराज वाडेकर?
चैतन्य वाडेकर सोशल मीडियात चांगलेच सक्रीय आहेत. त्यांचे तिथे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भांबोली गावात 17 ऑक्टोबर 1994 साली झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. इंस्टाग्राम व यूट्यूबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. या संस्थेंच्या माध्यमातून ते वारकरी संत, साहित्याचा प्रचार व प्रसार करतात. एक युवा किर्तनकार म्हणून त्यांची समाजाला ओळख आहे.