नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध महत्वपूर्ण देवींच्या मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
.
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रमुख मंदिरांच्या परिसरात भाविकांसाठी पोलिसांकडून मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
उत्सवाच्या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी मंदिर प्रशासनाला महिला, तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंदिर परिसरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साध्या वेशात देखील मंदिर परिसरात पोलिसांनी निग्रणी सुरू केली आहे.
उत्सवाच्या कालावधीत शहरातील विविध मंदिर परिसरात महिलांची मोठी गर्दी होते. गर्दीत महिलांकडील दागिने, तसेच पिशवीतील मोबाइल , रोकड चोरीला जाण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांसह स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. दसऱ्यापर्यंत मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.सार्वजनिक मंडळांकडून नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. उत्सव कालावधीत विविध मंडळांच्या परिसरात पोलिस कर्मचारी बंदोबस्तास तैनात राहणार आहेत