Video: ‘मुलगी दिसायला सुंदर असेल तर…’; आमदाराने जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याने वाद


Ajit Pawar MLA Comment About Women: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देवेंद्र भुयार यांनी जाहीर सभेत केलेल्या एका विधानावरुन बुधवारी राज्याच्या राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटलं. भुयार यांनी मुलींच्या दिसण्याबद्दल केलेल्या विधानावरुन विरोधकांनाही त्यांच्यावर निशाणा साधलेला असतानाच हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगत आमदाराने स्वत:चा बचाव केला आहे.

व्हिडीओत काय?

एका जाहीर सभेतील भुयार यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामधून त्यांनी, “लग्नाला मुलगी हवी असेल तर मुलगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट असेल, सुंदर असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. ती नोकरीवाल्यांना भेटतो. दोन नंबरची पोरगी कोणाल तर ज्यांचा पानठेला, धंदा, दुकान आहे त्यांना! तीन नंबरची गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्याच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही,” असं विधान केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ बुधवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भुयार यांच्यावर चौफेर टीका झाली. 

भुयार या व्हिडीओवर काय म्हणाले?

दरम्यान, भुयार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये एका जाहीर कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या ‘त्या’ विषयावरील हे विधान आहे. या विधानाचा आता कुठेही काहीही संबंध नाही. महिलांचा अपमान किंवा टीका करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यावेळी पोरांना लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. म्हणूनच तेव्हाची वास्तुस्थिती मांडली,” असं भुयार यांनी या व्हिडीओसंदर्भात म्हटलं आहे.

चित्रा वाघ संतापल्या

भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनाही या विधानावरुन भुयार यांचा निषेध केला. “आमदार भुयार यांनी केलेल्या विधानाचा निषेधच आहे. स्रीच्या रुपापेक्षा तिच्यात असलेली शक्ती ओळखायला हवी. त्यांची भाषा कोणत्याही सभ्य समाजाला शोभणारी नाही. अशी वक्तव्य आपण टाळली पाहिजेत. यामुळे महायुतीची बदनामी होईल,” असं चित्रा वाघ म्हणाल्या. 

ठाकरेंची सेना म्हणते, हा कृषी श्रेत्रातील लोकांची टिंगल करण्याचा प्रकार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या विधानावरुन भुयार यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांची खिल्ली उडवल्याचा दावा केला आहे. “देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे असं नाही तर हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडवण्यासारखं आहे. आपण काहीही बोललो तरी आम्हाला कोणी काहीही शिक्षा करु शकत नाही, असं यांना वाटतंय. याच मस्तवालपणातून अशी विधान होत आहेत,” असं म्हणत अंधारे यांनी टीका केली.

महिला उपभोगाचे साधन आहे का?

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या विषयावरुन भुयार यांच्यावर टीका केली आहे. “अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना ताब्यात ठेवावे. अशाप्रकारे महिलांचे वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे तुम्ही महिलांच्या मतांसाठी जीवाचं रान करत असतानाच दुसरीकडे असं त्यांचं वर्गिकरण करुन त्यांचा अपमान करत आहात. अशा विधानांमुळे तुमची मानसिकता समजते. महिला हे उपभोगाचे साधन आहे का?” असं म्हणत ठाकूर यांनी आपला संताप व्यक्त केला. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24