मी 8 तासांत 10 हजार फायलींवर सह्या करतो, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या अतिशयोक्तीपूर्ण विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगलीत शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना शिंदे आपण 8 तासांत 10 हजार फायलींवर सह्या करत असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात हे कसे शक्य? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे हे विधान अतिशयोक्तीपूर्ण असल्याचाही आरोप केला आहे.
एकनाथ शिंदे यासंबंधी म्हणाले होते की, मी शेती करण्यासाठी गावाकडे गेलो की काहीजण माझ्यावर टीका करतात. ते माझ्यावर हेलिकॉप्टरने शेती करण्यास जात असल्याचा आरोप करतात. मग आता गावाकडे कारने जाऊ का? तसे केल्यास मला तिकडे पोहोचायला 8 ते 10 तास लागतील. 8 तासांत मी 10 हजार फायलींवर सह्या करतो. त्यामुळे 8 ते 10 तासांचा वेळ वाया घालवण्याची फुसरत माझ्याकडे नाही. हा वेळ विरोधकांकडे होता. कारण त्यांचे पाय केव्हा जमिनीला लागलेच नाही. याऊलट मी मातीतला व जमिनीवरला माणूस आहे. त्यामुळे गावी गेले की माझे पाय आपोआपच शेताकडे वळतात.
ठाकरे गटाने केली होती दौऱ्यावर टीका
एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरने आपल्या मूळगावी गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले, आता आमचे सरकार आपल्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना आणली आहे. तसेच ज्येष्ठांसाठी मुख्यंत्री तिर्थक्षेत्र योजनाही सुरू केली आहे. कार्यकर्ता हा घरात नव्हे तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्यामुळे आम्ही शासन आपल्या दारी योजना सुरू केली.
या योजनेचा जवळपास 5 कोटी लोकांना लाभ मिळाला. आतापर्यंत सरकारी काम व सहा महिने थांब अशी स्थिती होती. पण आता आम्ही हे चित्र बदलले आहे. आम्ही थेट सरकारच लोकांच्या घरी नेण्याचे काम केले.
लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला फायदा
एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्याने केवळ 1 रुपया द्यायचा. उर्वरित पैसे सरकार भरणार. सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिलही माफ केले आहे. सरकार कल्याणकारी योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही स्वतः गरिबी अनुभवली. त्यामुळेच आम्ही या मार्गावर चालत आहोत. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर अनेक बहिणींनी स्वतःचे छोटेमोठे व्यवसाय सुरू केले. अनेक बहिणी या पैशाचा वापर स्वतःच्या संसारासाठी करतात. याचा अर्थ हे पैसे चलनात येत आहेत. त्याचा फायदा राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही होईल.