शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी 50 घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. 50 खोके एकदम ओके अशी घोषणाही त्यावेळी चर्चेत आली होती. आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव कधीही माफ करणार नाही, अशी टीका आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटावर केली
.
विट्यातील टेंभू योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा गाजलेला डॉयलॉग मारला. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकदम ओके असे म्हणताच लोकांमधून त्याला प्रतिसाद दिला. पुढे बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दहा-बारा नेते आहेत. त्यांचे भावी मुख्यंमत्री म्हणून पोस्टर लागतात. पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात शंका नाही, असा विश्वासही शहाजी पाटील यांनी व्यक्त केला.
आम्ही गुवाहटीला गेलो तर लाडक्या बहिणीला पैसे मिळाले असे का? शहाजीबापू पाटील यांनी यावेळी 50 खोके आरोपांवर भाष्य करत ठाकरे गटावर टीका केली आहे. पाटील म्हणाले की, उठ सुठ आम्हाला 50 खोके मिळाले असे ओरडत आहेत. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना 50 खोके भेटले, हे उद्धव ठाकरे यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे. आम्हीपण आमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की, आम्हाला 50 खोके मिळाले नाहीत. आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना देव कधीही माफ करणार नाही, अशी टीका पाटील यांनी केली. आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो, तर लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते का? असा सवालही शहाजी पाटील यांनी यावेळी विचारला.
मविआ भंगार गोळा करत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये इतर पक्षातील नेत्यांचे प्रवेश सुरू आहेत. यावर महाविकास आघाडीने भंगार गोळा करायला सुरुवात केली आहे, असा टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला भेटत नव्हते, असा आरोपही शहाजी पाटील यांनी केला.