सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील नवनाथ रामकिसन जाधव (36) यांची हाताळा येथे सासरवाडी आहे. नवनाथ हे उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबियांसह पुणे येथे राहात होते. त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये काम करीत होती. मात्र त्यांच्या सासरची मंडळी त्यांना त्रास देऊ लागली होती. सासरच्या मंडळींनी त्यांची पत्नी माहेरी घेऊन गेले. त्यांनी पत्नीला आणून सोडण्याची वारंवार विनंती केल्यानंतरही त्यांंच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्या पत्नीला पुणे येथे सोडले नाही उलट नवनाथ यांचाच छळ सुरु केला होता.
दरम्यान, नवनाथ हे गोरेगाव येथे गावी आले होते. त्यानंतर ता. 26 सप्टेंबर रोजी ते हाताळा येथे सासुरवाडीला गेले. त्यानंतर त्यांनी हाताळा शिवारात सासरच्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी ज्ञानेश्वर जाधव यांनी आज गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून नवनाथ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून पोलिसांनी दत्ता राऊत, प्रविण राऊत, दीपक तांबेकर यांच्यासह अन्य एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक नितीन लेनगुळे, जमादार अनिल भारती पुढील तपास करीत आहेत.