Sanjay Raut Slams CM Eknath Shinde: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागपूरमधील जाहीर सभेत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारवर निशाणा साधला. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर शब्दांमध्ये रात्री पावणे अकराच्या सुमारास आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन एक लांबलचक पोस्ट करत उत्तर दिलं. या टीकेला आता ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तितक्याच कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
“मुख्यमंत्र्यांना स्वत:ला ट्वीट करता येतं का?”
पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला. या प्रश्नावर राऊत यांनी मुख्यमंत्री कुठे बोलले? असं विचारलं असता पत्रकारांनी ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांनी टीका केली, असं सांगितलं. त्यावर संजय राऊतांनी, “मुख्यमंत्र्यांना स्वत:ला ट्वीट करता येतं का? आम्ही ओळखतो त्यांना. ट्वीट करायला माणसं ठेवली आहेत त्यांना नीट ट्रेनिंग द्या,” असा खोचक टोला लगावला. तसेच पुढे बोलताना, “कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात, गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेले अनेक वर्षांपासून कोण आहे? उद्धव ठाकरेंचं जे काही असेल ते आम्ही पाहून. गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सुरतला मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? मोदी-शाहांची धुणी-भांडी करायला कोण गेलं होतं? तुम्हीच गेला होता, मुख्यंत्रीपदासाठी,” असंही राऊत म्हणाले.
ठाकरे घरण्यामुळेच तुम्ही या पदापर्यंत पोहोलात
मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना संजय राऊतांनी, “दिल्लीमध्ये मोदी-शाहांच्या उंबरठ्यावरचं आपण पायपुसणे आहात. ज्या दिवशी तुमच्या डोक्यावरचा मोदी-शाहांचा हात जाईल त्या दिवशी तुमची या महाराष्ट्रात कचऱ्याइतकीही किंमत राहणार नाही,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांनी, “हे ठाकरे घराणं आहे. या ठाकरे घरण्यामुळेच तुम्ही या पदापर्यंत पोहोचले आहात हे लक्षात घ्या मिस्टर शिंदे! ठाकरेंवर बोलताना आपलं पूर्वायुष्य का होतं हे विसरु नका. आपण गुजरातच्या व्यापारी मंडळाचे गुलाम आहात,” अशा तिखट शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.
मुख्यमंत्री काय म्हणालेत?
“काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते,” असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख न करता आपल्या ट्वीटर पोस्टमधून लगावला. “लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे,” असा टोलाही एकनाथ शिंदेंनी या पोस्टमधून लगावला.
काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते.
वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2024
हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही
“बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे,” असं थेट आव्हानच शिंदेंनी ठाकरेंना पोस्टमधून दिलं.