लहान भावाला केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून तरुणाचा खून करून मृतदेह खदानीमध्ये फेकून दिल्याची घटना मारूंजी येथे घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तीन तर हिंजवडी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
.
विकी ऊर्फ शुभम सीताराम परिहार (वय २१, रा. जांबे, ता. मुळशी , जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाचा खून केला असल्याची माहिती चिखली पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन जणांना अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली. तसेच उर्वरित दोन आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.
एका आरोपीच्या १२ वर्षीय भावाला मृत विकी याने मारहाण केली. या कारणावरून संतापलेल्या पाच जणांनी विकी याला मारून त्याचा मृतदेह हिंजवडी जवळील खदानीमध्ये टाकून दिला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना रक्ताचे डाग आढळून आले. मृत विकी याच्या आईने २६ सप्टेंबर रोजी आपला मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.