हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस मैत्री करण्यास भाग पडून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २७ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरु केला आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिला गृहरक्षक दलाच्या भरतीची तयारी करीत होती. या भरतीसाठी गावालगतच ती महिला मैदानी चाचणीचा सराव करीत होता. यावेळी अक्षय सोनुने (रा. माळसेलू) या तरुणाने त्या महिलेसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने दाद दिली नाही.
त्यानंतर त्याने महिलेस तु माझ्याशी मैत्री कर अन्यथा मी माझ्या जिवाचे बरे वाईट करेल नाही तर तुझ्या पतीचे बरेवाईट करेल अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. सदर महिला घरात एकटी असतांना अक्षय याने त्या महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान, या प्रकारामुळे सदर महिला घाबरून गेली. सदर प्रकार तिने कुटुंबियांना सांगितल्यानंतर तीच्या कुटुंबियांनी तिला सोबत घेऊन थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. या ठिकाणी महिलेने रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अक्षय सोनुने याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शालीनी नाईक, पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले, पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार आकाश पंडीतकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अक्षयचा शोध सुरु केले आहे.