केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका पथकाने शुक्रवारी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली. र
.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील 14 सदस्यांचे एक पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. हे पथक आज व उद्या असे सलग 2 दिवस राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. या पथकाने सकाळी 10 वा. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आयोगाकडे राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली.
एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी
याविषयी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील म्हणाले, आजच्या बैठकीत आम्ही निवडणूक आयोगापुढे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे. त्यामुळे इथे एका टप्प्यात निवडणूक घेतली तरी चालते. यामुळे आम्ही निवडणूक आयोगापुढे राज्य विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घेण्याची विनंती केली. आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यावरही विचार केला पाहिजे. यासंबंधी आयोगाने जाहिरातीच्या बाबतीत आयोगाने सरकारी रेट धरला पाहिजे किंवा जाहिरातीवर होणारा खर्च निवडणुकीच्या खर्चातून वगळला पाहिजे.
अनिल पाटील यांनी यावेळी आयोगाकडे आचारसंहितेचे गुन्हे दाखल करताना संबंधित उमेदवारांचे म्हणणे विचारात घेण्याचीही विनंती केली. निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा उमेदवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे त्यांनी केलेली ही मागणी अत्यंत महत्त्वाची आहे.
उद्या जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी संवाद
दुसरीकडे, निवडणूक आयोगाचे पथक शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी संवाद साधणार आहे. या प्रकरणी प्रशासनाची प्रशासकीय तायरी, पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात विधानसभा निवडणुकीसंबंधी एखादी सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे.
यंदाची निवडणूक फारच रंजकदार
उल्लेखनीय बाब म्हणजे 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. गत काही वर्षांत राज्याचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 2 महत्त्वाच्या पक्षांत फूट अनुभवली आहे. सध्या या दोन्ही पक्षांचे 2 स्वतंत्र गट निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यातच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात तिसरी आघाडी स्थापन केली आहे. यामुळे ही निवडणूक चांगलीच रंजकदार होणार आहे.
वंचितची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी
दुसरीकडे, महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. या दोन्ही आघाड्यांत काही जागांवरून अद्याप मतभेद आहेत. त्यामुळे त्यांच्या जागावाटपाला अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. पण वंचित बहुजन आघाडीने शनिवारी आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. वंचितने आपल्या मित्र पक्षांच्या इतर 2 उमेदवारांच्याही नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यात या महत्त्वाच्या पक्षाने सर्वच इतर पक्षांवर आघाडी घेतली आहे.