एक आमदार असलेल्या पक्षालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशा मोजकी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर राजकीय वर
.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली मुख्यमंत्री होण्याची महत्त्वकांक्षा व्यक्त केली होती. माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदाहून पुढे सरकतच नाही, मग मी काय करू, असे ते बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या प्रकरणी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ज्या पक्षाचा एक आमदार आहे, त्यालाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल.
मुख्यमंत्री कोण होईल हे संसदीय मंडळ ठरवेल
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होईल? या प्रश्नाचे सावध उत्तर दिले. ते म्हणाले, याचे उत्तर देण्याची क्षमता माझ्यात नाही. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकतात, पण मी महाराष्ट्र भाजपचा नेता आहे. आमच्या पक्षात मुख्यमंत्री कोण होणार? हे पक्षाचे संसदीय मंडळ ठरवते.
मी आधूनिक अभिमन्यू, मला चक्रव्ह्यूह तोडता येते
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी कमी होते हा इतिहास आहे. हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर अभिमन्यू अडचणीत येईल का? या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष भाजप ठरेल आणि महायुती सर्वात मोठी आघाडी म्हणून अस्तित्वात येईल. महायुती पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या राजकीय संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मला संपवण्याची भाषा केली. पण जनतेशिवाय कुणीही कुणाला संपवू शकत नाही. ते ही राहतील. आणि मी ही राहील. त्यांनी कितीही प्रयत्न केला तर जनतेचा आशीर्वाद असेपर्यंत त्यांना मला संपवता येणार नाही. मी आधूनिक अभिमन्यू आहे. मला चक्रव्ह्यूह तोडता येते.
धारावी प्रकल्पावरील विरोधकांचे आरोप फेटाळले
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी धारावी प्रकल्पाविषयी विरोधकांकडून केले जाणारे आरोपही फेटाळून लावले. धारावी प्रकल्पात अदानी समुहाला फायदा पोहोचवण्याच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. या प्रकरणाच्या प्रक्रियेत उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाने एक अट फायनल केली होती. त्यात एक सुधारणा करण्यात आली आहे. टीडीआरमध्ये कोणतेही कॅपिंग नव्हती. त्यामुळे ज्या कुणाला टेंडर मिळाले असते तो मुंबईचा मालक झाला असता. आम्ही 90 टक्क्यांची कॅप लावली आहे.
गौतम अदानींना काहीच दिले नाही
फडणवीस म्हणाले, डीआरपीवर अदानी नाही तर महाराष्ट्र सरकारचे नियंत्रण आहे. आम्ही अदानीला काहीही दिले नाही, आमची डीआरपीमध्ये हिस्सेदारी आहे. मुंबईभोवती वेगळी धारावी उभारल्या जात असल्याच्या आरोपावर फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला डीआरपीमध्ये अधिकार आहेत. शहरात 8 प्राधिकरणे स्वत:ची विकास नियंत्रण नियमावली तयार करतात. नियम तयार करून ते शासनाकडे पाठवावे लागतात, ते मंजूर झाल्यानंतरच त्यांची अंमलबजावणी होऊ शकते. सरकारला वाटेल ते अदानी करेल. त्यांनी तसे केले नाही तर टेंडर त्यांच्याकडून काढून घेतले जाईल.
हे ही वाचा…
मला मुख्यमंत्री व्हायचंय, पण गाडी पुढे सरकतच नाही:अजित पवारांची इच्छा पुन्हा उफाळली; विधानसभा महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्धार
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा उफाळून आली आहे. माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदाहून पुढे सरकतच नाही, मग मी काय करू, असे ते बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर