शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टाने त्यांना ठोठावलेल्या 15 दिवसांच्या शिक्षेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात. त्यानंतर आमच्यासारख
.
संजय राऊत यांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी सोमवारी येथील माझगाव कोर्टाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. संजय राऊत यांनी या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची घोषणा केली आहे. पण तूर्त या प्रकरणी त्यांच्यावर पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची टांगती तलवार लोंबकळत आहे.
न्यायव्यवस्थेचे खालपासून वरपर्यंत संघीकरण झाले
संजय राऊत गुरुवारी याविषयी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सद्यस्थितीत न्यायव्यवस्थेचे खालपासून वरपर्यंत संघीकरण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सरन्यायाधीशांच्या खरी गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात. त्यानंतर आमच्यासारख्या भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या लोकांना न्याय कुठून मिळणार? हा निर्णय अपेक्षितच होता.
मी न्यायालयाचा आदर करतो. पण मी काय म्हणालो होतो? मीरा भाईंदर परिसरात युवक प्रतिष्ठानकडून काही काम झाले होते. त्याविषयी अनियमितता झाल्याचा आरोप मीरा भाईंदर महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी एका पत्राद्वारे तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केला होता. त्यावर तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली होती.
या मुद्यावर विधानसभेच्या पटलावरही चर्चा झाली. त्यानंतर यात भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करत एक ठरावही पारित झाला होता. हे सर्वकाही ऑनरेकॉर्ड आहे. ते केवळ मी बोलून दाखवले. यामुळे माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा कसा होऊ शकतो? असा सवाल राऊत यांनी यासंबंधी उपस्थित केला.
न्यायव्यवस्था कुणाची तरी रखेल झाली
संजय राऊत पुढे म्हणाले, शाहीर अण्णाभाऊ साठे ही न्यायव्यवस्था कुणाची तरी रखेल झाले असे म्हणाले होते. हे स्पष्टपणे दिसत आहे. पण त्यानंतरही आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. आम्ही या आदेशांना वरच्या कोर्टात आव्हान देऊ. पण न्यायव्यवस्था कुणाची तरी रखेल झाली हे स्पष्ट आहे.
शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान देणार
सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होत असल्याचे मला दिसले. त्यामुळे मी हा मुद्दा उपस्थित केला. आज मला 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड आदी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मला 15 दिवसच काय 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी खरे बोलणे थांबवणार नाही. माझगाव कोर्टाने आमचे पुरावे फेटाळले. त्यामुळे आम्ही या शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान देणार आहोत. तिथे या प्रकरणातील सर्व पुरावे सादर केले जातील.
आमच्यासारख्यांचे दावे फेटाळले जात आहेत. कारण सद्यस्थितीत न्यायव्यवस्थेचे खालपासून वरपर्यंत संघीकरण झाले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे मोदक खायला आपल्या घरी पंतप्रधानांना बोलावतात आणि पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जातात त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार? असा सवालही संजय राऊत यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा…
संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी:कोर्टाने ठोठावली 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड; मेधा सोमय्यांनी दाखल केला होता दावा
मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाब्यात माझगाव न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आजच हा निकाल दिला. या प्रकरणात संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेसह 25 हजारांचा दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. वाचा सविस्तर