Breaking News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत बैठक


Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्षासोबत बैठक देखील घेणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

कसा आहे निवडणूक आयोगाचा दौरा?

26 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होणार आहे. दुपारी 1 वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. 

संध्याकाळी 5 वाजता मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिका-यांशी महत्त्वाच्या बैठका होतील. यात राज्याच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे?  हे आयोग जाणून घेणार आहे. त्यानंतर 28 सप्टेबरला सकाळी साडे नऊ  वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील.त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. महायुती आणि मविआमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मविआमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून वाद सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये देखील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं 11 उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतलीय. 

विधानसभा निवडणुकांचा वेध सर्वच पक्षांना लागला आहे आता आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागलंय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय. ’15  दिवसात आचारसंहिता लागणार आणि लवकरच विधानसभेची निवडणूक होईल,असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24