घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा, म्हाडाने डोमेसाईल प्रमाणपत्राबाबत घेतला मोठा निर्णय


Mhada Mumbai Lottery: मुंबईत एक तरी हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरांच्या किंमती आता गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांना मुंबईत परवडेलच असं नसतं. मुंबईकरांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असते. अलीकडेच म्हाडाने मुंबईत 2030 घरांची लॉटरी काढली आहे. त्याचबरोबर म्हाडाने आणखी एक दिलासा दिला आहे. म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खूशखबर आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, घराचा ताबा घेण्यापूर्वी संबंधित अर्जदाराला नवीन डोमेसाईल सादर करणे बंधनकारक असणार आहे.

म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सोडतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे शेकडो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना सध्या १ जानेवारी २०१८ नंतर जारी केलेले आणि बारकोड असलेले डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बारकोड असल्यामुळे सिस्टममधून या डोमेसाईल प्रमाणपत्राची पडताळणी करणे म्हाडाला सोपे जाते. 

अनेक जणांकडे २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र असून आपल्याला त्या डोमेसाईलच्या आधारावर म्हाडाच्या  घरांसाठी अर्ज भरता येईल अशा भ्रमात ते अर्जदार राहतात. ऐनवेळी अर्ज भरताना मात्र त्यांची गोची होते. नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळीदेखील अनेकांनी जुने डोमेसाईल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जावे, अशी मागणी म्हाडाकडे केली होती.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदार आता जुने डोमेसाईल प्रमाणपत्र अपलोड करू शकणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून याची अंमलबजावणी होईल. संबंधित अर्जदार विजेता झाल्यानंतर त्याला ठरावीक दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीत त्याला बारकोड असलेले नवीन डोमेसाईल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

दरम्यान, मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ घरांचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.   येत्या ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24