“अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला…”, उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया



Udayanraje Bhosale Latest News : मुंब्रामध्ये झालेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भूमिका मांडली. “अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं, हे खूप सहज झालं”,  म्हणत त्यांनी सविस्तर भाष्य केले. 

अक्षय शिंदे याने चौकशीसाठी घेऊन जात असताना शेजारी बसलेल्या पोलिसाची रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि गोळी झाडली. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पण, पोलिसांनी ठरवून एन्काऊंटर केल्याचा आरोप विरोधक करत आहे. आरोपींना वाचवण्यासाठी हे करण्यात आल्याची टीका होत आहे. या घटनेवर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी भूमिका मांडली. 

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे भोसले काय म्हणाले? 

उदयनराजे म्हणाले, “सत्ताधारी असो वा विरोधक त्यांच्या कुटुंबात अशी घटना घडली असती, तर काय केलं असतं? बोलले असते का की, त्या कुटुंबाचं काय? ज्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. मी त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून हे बोलतो आहे.”

“अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं. अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि त्यांना जनतेने तुडवून मारलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

एका गोळीत अक्षय शिंदेचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेवर एक गोळी झाडण्यात आली होती. त्यामुळे तो जखमी झाला. रुग्णालयात नेण्यात आले असता, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणावरून सरकारवर टीका होत असून, सीडीआयडीकडे तपास देण्यात आला आहे. 

बदलापूरमधील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाले. त्या प्रकरणात पोलिसांनी सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेला अटक केली होती. तो सध्या तळोजा कारागृहात होता. पत्नीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होते. पण, वाटेतच एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Akshay Shinde shouldn’t have been shot, people should have trampled him to death, says Udayanraje Bhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24