महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसापासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कन्नड तालुक्यातील मराठा बांधवांनी अंबाडी
.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाडी धरणात कन्नड येथील संतोष पवार, चिकलठाणचे राजेंद्र चव्हाण, हतनुरचे भाऊसाहेब परांडे, हतनुरचे राजेंद्र मोहिते, हस्ताचे संतोष निळ, चापानेरचे युवराज बोरसे या 6 मराठा तरुणांनी अंबाडी धरणात उड्या मारुन तब्बल अडीच तास जलसमाधी आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय, तुमचे आमचे नात काय – जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा, लढेंगे या मरेंगे, हम सब जरांगे, यासह इतर घोषणा देत या वेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आंदोलनाची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना समजताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार नायब तहसीलदार दिनेश राजपूत, कन्नड शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी, पोलिस नाईक सुलाने, छत्रपती संभाजीनगरचे अग्निशमन दलाचे अधिकारी, नगरपरिषदेचे देविदास पाटील, बाजीराव थोरात हे आप आपल्या लवाजमासह अंबाडी धरणावर पोहोचले.
या वेळी आंदोलकांशी चर्चा करुन त्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारपर्यंत लगेच पोहोचवतो असे असे आश्वासन नायब तहसीलदार दिनेश राजपूत यांनी आंदोलनकत्त्यांना दिल्यानंतर आंदोलन कर्त्यांनी पाण्यातुन वरती येत आंदोलन मागे घेतले. तसेच त्यांच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार दिनेश राजपुत यांच्याकडे दिले. यावेळी तालुक्यातील अनेक गावातील मराठा समाज बांधवांची अंबाडी धरणावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.