बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये खात्मा झाला. अक्षयने पोलिसांच्या व्हॅनमधून जाताना पोलिसांचे पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पोलिसांची गोळी थेट त्याच्या डोक्यात शिरली अन् क
.
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिस सोमवारी सायंकाळी त्याला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते. त्यावेळी त्याने पोलिसांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पोलिस इन्स्पेक्टर संजय शिंदे व सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर नीलेश मोरे जखमी झाले. पण त्या स्थितीतही संजय शिंदे यांनी आरोपी अक्षय शिंदेवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःचे प्राण संकटात टाकत गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
कोण आहेत पीआय संजय शिंदे?
संजय शिंदे यांची पोलिस कारकिर्द फारच वादग्रस्त आहे. त्यांनी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी विभागात वादग्रस्त आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. 1983 मध्ये पोलिस दलात दाखल झालेले प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक गुन्हेगारांचे एन्काउंटर केले. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचाही समावेश होता. बदलापूर बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी महायुती सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) ते सदस्य होते.
विजय पालांडे प्रकरणात झाले होते निलंबन
पीआय संजय शिंदे यांच्या नावावर अनेक वाद आहेत. अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पालांडे याला पोलिस कोठडीतून पळवून लावण्यात मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. पालांडे यांच्या गाडीत त्यांचा गणवेशही सापडला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. विशेषतः त्यांना सेवेतून बरखास्त करण्याचा प्रस्तावही पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला होता. पण पोलिस महानिरीक्षकांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांचा पुन्हा मुंबई पोलिस दलात समावेश करण्यात आला.
अक्षयच्या एन्काउंटरची स्क्रिप्ट सरकारने लिहिली
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची कहाणी सरकारने लिहिल्याचा आरोप केला आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यापूर्वीच ठार मारण्यात आले. यामुळे पीडित कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही. यातून सरकारची अकार्यक्षमता सिद्ध होते. सरकारनेच या एन्काउंटरची कहाणी लिहिली व त्यावर अंमलबजावणी केली, असे त्या म्हणाल्या.