हिंगोली पालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छता हिच सेवा या उपक्रमांतर्गत मंगळवारी ता.24 रामलिला मैदानावर स्वच्छता मोहिम राबवली असून अवघ्या एक तासात मैदानाचा परिसर चकाचक झाला आहे. सदर मोहिम सुरुच राहणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
.
हिंगोली पालिकेने स्वच्छतेचे उपक्रम राबवून केंद्र व राज्य शासनाचे पुरस्कार मिळविले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शहरात उभी केलेली चळवळ विद्यमान मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी कायम ठेवली आहे. मुख्याधिकारी मुंडे यांनी शहरात स्वच्छ शहर सुंदर शहरची संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. या संकल्पनेला नागरीकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून स्वच्छते सोबतच वृक्षलागवड करण्यात आली आहे.
दरम्यान, यावर्षी पालिकेने स्वच्छता हिच सेवा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपमु्ख्याधिकारी उमेश हेंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सार्वजनिक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून श्रमदानातून स्वच्छता केली जात आहे. सोमवारी शहरालगत सिरेहक शाह बाबा दर्गा तलाव परिसरात स्वच्छता मोहिम राबविली होते.
त्यानंतर रामलिला मैदानावर ऐतिहासीक दसरा महोत्सव भरतो. या ठिकाणी येणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आज पालिका कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून स्वच्छता केली.यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, शाम माळवटकर, प्रतिक नाईक, देविसिंग ठाकूर, वसंत पुतळे, विनय साहू, संदीप घुगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सुमारे एक तासाच्या आत परिसर चकाचक केला. यामध्ये मेनकापड, कागद, काडी कचरा गोळा करून डंपींग ग्राऊंड येथे नेण्यात आला आहे. यापुढेही हि मोहिम सुरुच राहणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे म्हणाले की, हिंगोली शहरात पालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये नागरीकांचा सहभाग असल्यामुळेच पालिकेला केंद्र व राज्याकडून पारितोषीक मिळविला आले आहे. या उपक्रमातही नागरीकांनी सहभागी होऊन आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच विविध संस्थांनी एकत्र येऊन एक दिवस श्रमदान करून स्वच्छता मोहिम राबवावी.