MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर



MPSC Exam ( Marathi News ) : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं असून महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसंच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा –२०२४ चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक १ डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इमारतीमध्ये आयोजित आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिव उपस्थित होते.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०१४ अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक दिनांक ८ मे, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे  दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- २०२४ करिता २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती.

अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर

कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृषी सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या अर्ज स्वीकृतीचा कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर, २०२४ मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रियेसंदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता, मनुष्यबळ, निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन परिक्षेचे आयोजन  दिनांक १  डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळवलं आहे.

Web Title: Success of mPSC students agitation Commission announces new date of prelim exam including Agriculture service posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24