मुंबई2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही. अशात महाविकास आघाडीकडून शरद पवार हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवतील, असे म्हटले जात होते. मात्र, कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे, कोणते पद द्यायचे, हे निवडणुकीत लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर ठरवता येईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे सांगणे टाळले आहे.
निवडणुकीत लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतरच निर्णय होईल
शरद पवार यांनी मोरारजी देसाई यांचा पंतप्रधान होण्याचा किस्सा सांगितला. पवार म्हणाले की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो, असा विश्वास आम्हाला लोकांना द्यायचा आहे. निवडणुकीत लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला कोणते पद द्यायचे, हे ठरवता येईल. देशामध्ये जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनात समविचारी लोकांनी एकत्र येत निवडणूक लढवली, लोकांनी निवडून दिल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. निवडणुकीआधी मत मागताना मोरारजी देसाई पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे लोकांना सांगितले नव्हते. तरीही लोकांनी त्यांना निवडून दिले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
तिरुपतीमधील प्रकार गंभीर, लोकांच्या भावनांशी खेळू नये
पुढे बोलताना शरद पवार यांनी तिरुपती बालाजीच्या मंदिरातील लाडू प्रसादाच्या वादावर भाष्य केले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ते लोकांचे महत्वाचं श्रद्धेचे स्थान आहे. तिथे लोक श्रद्धेने जात असतात. तिथं मिळणाऱ्या प्रसादात काहीतरी मिसळल्याचे मी वाचले आहे. मात्र याबाबत माझ्या हातात अधिकृत काही माहिती आलेली नाही. पण ते जर खरे असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण लोकांच्या भावनांशी कुणी खेळू नये, असेही शरद पवार म्हणाले.