लेझर लाइटचा तरुणांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम: महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेने केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहून वेधले लक्ष – Nagpur News



गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाइटचा वापर तरुणांच्या डोळ्यांवर हाेवू लागला आहे. दृष्टिपटलावर म्हणजेच रेटिनावर रक्तस्राव होऊन काही तरुणांना एका डोळ्याने दिसण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. २०२३ मध्येही अशा प्रकारच्या तक्रारीत वाढ झाली होती.

.

लेझर लाइटचा झोत आकाशाकडे असणे अपेक्षित असताना हा झोत थेट गर्दीवर फिरवला जातोे. थेट डोळ्यांवर आल्यामुळे रक्तस्रावाचा धोका होवून दिसणे कमी होवू शकते. या करीता लेझर लाइट शोच्या नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी, लेझरचा झोत आकाशाच्या दिशेने वर असावा, आदी मागण्या महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष संतोष अग्रवाल व सचिव अतुल कठाणे यांनी गृहसचिवांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेझर बीममुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे समोर आले आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक गणेश मंडळांनी रथावर लेझर बीमचा वापर केला होता. त्याच्या प्रखर झोतामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी घेऊन अनेक तरुण मागील काही दिवसांत नेत्रविकार तज्ज्ञांकडे येत आहे असे महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डाॅ. विनीत अरोरा यांनी सांगितले.

लेझर बीम हा तीव्र प्रकाशझोत असतो. तो डोळ्यावर पडल्यानंतर डोळ्यांवर ताण येऊन बाहुली आकुंचन पावते आणि डोकेदुखी सुरू होते. अपस्माराचे झटके येण्याचा त्रास असलेल्या रुग्णांना अशा प्रकारच्या प्रखर प्रकाशझोतांमुळे हा त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. लेझर बीममुळे डोळ्यावर होणारा परिणाम तपासण्याची आवश्यकता आहे असे डॉ. अरोरा यांनी सांगितले.

अनंत चतुर्दशीला म्हणजेच मंगळवारी १७ रोजी गणेश विसर्जन झाले. यंदा विसर्जनाच्या मिरवणुकीत रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळाली. विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरास मज्जाव करण्यात आला होता. असे असले तरी यंदा काही मंडळांनी नियम धाब्यावर बसवून सर्रास डीजेचा वापर केला. सोबतच लेझर लाइटचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मिरवणुकीत लेझर लाइटच्या थेट संपर्कात आलेल्या काही तरुणांमध्ये आता गंभीर दृष्टिदोष आढळून येत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24