चोपडा53 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्याशी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. या बंडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून वेळोवेळी ’50 खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत टीका करण्यात आली होती.
आता शरद पवार गटाचे खासदार अमोल यांनी यापुढेही जात ’50 खोके, एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके’ असे विधान केले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा रविवारी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे होती. यावेळी अमोल कोल्हे यांनी बंडखोर आमदारांसह महायुतीवर हल्लाबोल केला.
स्वतःला महाशक्ती म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत, महाराष्ट्रातील युवकांच्या हक्कांचा रोजगार पळवला जात आहे. गुजराती बॉसच्या ताटाखालचे मांजर असलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. अशा सत्ताधाऱ्यांना आपण धडा शिकवायचा आहे असे आवाहन अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना केले.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले ही, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या पाच आमदारांना निवडून दिल्यानंतर जनतेला वाटले होते की, आम्ही शिवसेनेचे वाघ निवडून दिले. 50 खोके, एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके. जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या ताकदीवर निवडून आलेल्या एका आमदाराने मंत्री पदाच्या खुर्चीसाठी गद्दारी केली, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी मंत्री पाटील यांच्यावर टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील 6 आमदारांनी जनतेशी गद्दारी केली आहे. याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल.
…तेव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व अमोल कोल्हे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वासाठी बंडखोरी केली, असे गद्दार आमदार म्हणत होते. पण भाजपची सत्ता असलेल्या राज्यात महिलांवर अत्याचार होतात तेव्हा कुठे गेले होते यांचे हिंदुत्व? तेव्हा लाज वाटली नाही का तुम्हाला… छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या या महाराष्ट्रात दोन चिमुकलींवर अत्याचार होतो, तेव्हा तुम्ही गप्प कसे? तेव्हा तुम्हाला का नाही बोलता आले? बहीण जर लाडकी असेल तर ती सुरक्षित सुद्धा असली पाहिजे. सुरक्षिततेचा हक्क तिला मिळाला पाहिजे. सध्याच्या सरकारचे काय आणि कसे सुरू आहे, हे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक राहिला नाही.