पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे पालखी मार्ग भूमिपूजन सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ या
.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव पुणे विमानतळाला देण्यात येणार आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या नावासंदर्भात प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. तो आम्ही स्वीकारला आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं, तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात नवीन विमानतळ तयार करण्यात येणार आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यायचे आहे. मात्र पुण्यात जे विमानतळ आहे, ते नव्या पद्धतीने बनवण्यात आले आहे. त्याचे नामकरण जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यांच्या या प्रस्तावावर आम्ही तात्काळ काम सुरू केले आहे. येत्या कॅबिनेटमध्ये आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत दिवेघाट ते हडपसर पॅकेज 6 रस्त्यांचे चौपदरीकरण, मुळा व मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम, सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत 1.6 किमी लांबीच्या सेवा रस्त्याचे बांधकाम, या सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.