![]()
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा अमरावतीत होणार आहे. ६४ वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात अमरावतीला हा बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे.
.
या अंतिम फेरीत राज्याच्या विविध विभागांतून पुरस्कारप्राप्त पहिली दोन नाटके सादर केली जातील. यामुळे राज्यभरातील सुमारे ४० नाटकांचे कलावंत, दिग्दर्शक, लेखक आणि इतर नाट्यकर्मी अमरावतीत दाखल होतील.
स्पर्धेच्या सर्व विभागीय फेऱ्या पूर्ण होऊन निकाल नुकतेच घोषित झाले आहेत. अंतिम फेरीच्या तारखा लवकरच निश्चित केल्या जातील. अमरावतीत ही अंतिम फेरी आयोजित करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाचे सदस्य ॲड. प्रशांत देशपांडे आणि नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी सरकारकडे मागणी केली होती.
या मागणीसाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा प्रस्ताव मान्य करून आवश्यक त्या तयारीच्या सूचना दिल्या.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांना याबाबत लेखी कळवले आहे. या भेटीवेळी भाजपचे अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या मागणीला जिल्ह्यातील आमदार प्रतापदादा अडसड, आमदार राजेश वानखडे, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांनीही सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांना पत्र देऊन पाठिंबा दिला होता.
यंदा राज्य नाट्य स्पर्धेची विभागीय फेरी पीडीएमसी परिसरातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेने बांधलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात झाली होती. या अत्याधुनिक सभागृहामुळे नाट्य रसिकांना उत्कृष्ट अनुभव मिळाला, ज्यामुळे अंतिम फेरी अमरावतीत घेण्याच्या मागणीला बळ मिळाले.