![]()
विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप केला. आम्हाला आयोग
.
ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत वांद्र्यातील शासकीय वसाहतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यात ते म्हणाले, येथील कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून हक्कांच्या घरांसाठी संघर्ष करत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीवेळी 14 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारने एक परिपत्रक काढून संबंधितांना प्लॉट देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर निवडणूक झाली. नवे सरकार आले. पण त्यावर काहीच झाले नाही. त्यामुळे सरकारने हा प्लॉट किती मोठा व कधी देणार आहात? हे स्पष्ट करावे.
सरदेसाई म्हणाले – शिंदेसेना व अजितदादांचा पक्ष
सरकारने जीआर काढल्यानंतर आजपर्यंत वांद्र्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना 14 प्लॉटचे वाटप केले आहे. या प्रकरणी तुम्ही कोणतीही समिती बनवली नाही. मग यावेळी तुम्ही समिती का बनवली. समिती बनवायची होती तर ती बनवायला 7 महिने का लागले. समिती बनल्यानंतर तिची बैठक घेण्यास 3 महिने का लागले? असे विविध प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.
या समितीत तुम्ही भाजपचे 2 पदाधिकारी घेतलेत, शिंदेसेनेचा 1 पदाधिकारी घेतला. अजितदादांच्या पक्षाचा एक माजी पदाधिकारी घेतला. मी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, मग मला त्या समितीत का घेण्यात आले नाही? असे ते म्हणाले.
शंभूराज देसाईंचा चर्चेत हस्तक्षेप
वरुण सरदेसाई यांच्या प्रश्नाला शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी उत्तर दिले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या चर्चेत हस्तक्षेप केला. वरुण सरदेसाई यांनी एकदा नाही दोनदा आमच्या पक्षाचा उल्लेख शिंदेसेना म्हणून केला. त्यांनी केंद्रीय निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तपासून पहावा. आयोगाने घटनेने कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे नाव आम्हाला दिले आहे. आमचे नाव शिवसेना असे आहे. त्याच्या खाली उबाठा वगैरे असे काहीही जोडलेले नाही. त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणूनच करावा, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरदेसाई यांनी शिंदेसेना म्हणाल्याचा उल्लेख कामकाजातून वगळण्याचीही मागणी केली.
अनिल पाटलांनीही केला राष्ट्रवादीचा उल्लेख
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री अनिल पाटील आपल्या जागेवरून उठले. त्यांनीही वरुण सरदेसाई यांच्या विधानावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, सन्मानयीय सदस्यांनी आमचाही उल्लेख अजितदादा गट असा केला. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांनी त्याचा स्पष्ट उल्लेख करावा, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनीही शिंदेसेना म्हटल्याचा दिला दाखला
शंभूराज देसाई व अनिल पाटील यांच्या विधानानंतर वरुण सरदेसाई पुन्हा उभे राहिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचा उल्लेख 4 वेळा शिंदेसेना म्हणून केल्याचा दावा केला. शंभूराज देसाई यांचे बरोबर आहे. निवडणूक आयोगाने तसे सांगितले आहे. पण काल एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 वेळा शिंदेसेना म्हणाले. आपण त्यांनाही हे सांगावे अशी माझी विनंती आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात किंचित हशा पिकला.