Separate Vidarbha Demand UBT vs Congress: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं. अगदी महाविकास आघाडीमधील प्रमुख घटकत पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना टोला लगावण्यापासून ते पार्थ पवार प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही राऊतांनी सुनावलं आहे. विशेष म्हणजे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला विरोध करताना राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.
विरोधी पक्ष नेता पद न दिल्याने सत्ताधाऱ्यांना टोला
सुरुवातीला राऊत यांनी विरोधी पक्ष नेता नसल्यावरुन सरकारवर निशाणा साधला. “विधिमंडळची सर्कस झाली आहे. दशावतार म्हणता येईल. विधिमंडळातील गांभीर्य संपलं. संसदेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीमुळे जाण आहे. विरोधी पक्ष नेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. गेल्या काही वर्षात 10-11 वर्षात विरोधी पक्ष नेता कुठे ठेवायचा नाही अशीच मागणी करायची. विरोधी पक्ष नेता महाराष्ट्रामध्ये दोन्ही सभागृहात नाही, याची सत्ताधारला लाज वाटायला हवी. याचा अर्थ त्यांना तुम्ही घाबरता,” असा घणाघात राऊतांनी केला.
“तुमच्या चुका दाखवल्या जातात. देवेंद्र फडणवीस, अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे संकेत पाळायचे नाहीत. राहुल गांधी विरोधी पक्ष नेता असल्यामुळे भाजपाचे धिंदोडे निघत आहेत. त्यामुळे अमित शाहापासून सर्व घाबरतात,” असं राऊत म्हणालेत.
महाराष्ट्रच्या लढ्यात गौतम अदानी नव्हते
“महाराष्ट्रच्या लढ्यात गौतम अदानी नव्हते. आता महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय यावर चर्चा व्हावी. मुंबईतच्या लढ्यात भाजपा कुठेच नव्हता,” असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्रच्या प्रश्नात सर्वांनी एकत्र यायला हवं. आपले पक्षीय विरोधक असतील सर्वांनीच. बावनकुळे सांगतात विदर्भ वेगळं करण्याचं आमचं काम सुरु आहे. तरी मिंधें मधला एकही मंत्री उसळून उठला नाही याचा अर्थ तुम्ही अमित शाहांच्या दबावाखाली आहेत,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
गुजरात पालघरमध्ये घुसला
“पालघरमध्ये गुजरात पूर्णपणे घुसलाय. पालघरच्या सीमा उल्लंघन करून गुजरातने आता प्रवेश केला. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी त्यांनी पालघर वर दावा केला होता त्यामुळे बुलेट ट्रेन गुजरातमधून काढली आहे,” असा घणाघात राऊतांनी केला.
महायुतीवरुन शिंदेंना टोला
“महायुती म्हणजेच कोण ही महायुती आहे का? आता कळलं मला. मिंधेंचा पक्ष हा अमित शाहांचा पक्ष आहे. महाराष्ट्रमध्ये देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण हे महायुतीच्या विरोधात आहे. एकनाथ शिंदे, अमित शाहांकडे आपलं रडगाणं सांगायला गेले होते. अमित शाहांना देवेंद्र फडणवीस ना चेकमेट करायचं आहे त्यांना फडणवीस यांना दिल्लीला येऊन द्यायचं नाही. दोन ठाकरे एकत्र आले याची भीती आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार प्रकरणावरुन अजित पवारांवर निशाणा
“पार्थ पवार यांच्या पिताश्रीचं इतकं वजन आहे. पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेत कोणाची हिम्मत आहे त्यांना काय बोलायची? आता अजित पवार यांनी रंग सफेदी करू नये. अजित पवार यांना मोदींनी वाचवलंय. सोप्पे रस्ते निर्माण केलेत.
वेगळ्या विदर्भावरुन वडेट्टीवारांना टोला
“काँग्रेसनं कितीही आपटलं तरी त्यांचं हे राजकारण यशस्वी होणार नाही,” असं म्हणत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले आहे. “काँग्रेसनं कितीही आपटलं तरी विदर्भ वेगळा होणार नाही, आता उद्धव -राज ठाकरे एकत्र आहेत,” असं राऊत म्हणाले. आम्ही वडेट्टीवारांना फार महत्व देत नाही, असंही राऊत म्हणाले.
वडेट्टीवारांचं उत्तर
“मी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडत असताना हायकमांडशी बोललो आहे. ते काय बोलले हा त्यांचा प्रश्न. आम्ही कुठे देतो संजय राऊत यांना महत्त्व?” अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी राऊतांच्या या प्रतिक्रियेवर नोंदवली. “आमच्या पक्षाचा विषय आहे. मी का देऊ संजय राऊत यांना महत्त्व. वैचारिक भूमिका वेगळी आहे. 75 हजार कोटींच्या (पुरवणी) मागण्यात विदर्भ कुठे आहे? आज ही पोरांचे स्थलांतर सुरू आहे. तेलंगणामध्ये जाऊन काम करत आहेत. तिथला तरुण मिरची तोडायला मजूर म्हणून तेलंगणात जातो,” असं वडेट्टीवार म्हणाले.