केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पक्षाला भाजप सुद्धा टाळू शकत नाही. त्यांच्या एका दट्ट्यामुळे महाराष्ट्र भाजपने एक पाऊल मागे टाकत महापालिका निवडणुकांसाठी शहांच्या पक्षाबरोबर युती केली, अशा शब्दांत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी सत्ताधारी शिवसेना –
.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत भाजप – शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुका मिळून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी,रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी फोडून शिंदेंच्या नाकीनऊ आणले होते. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिंदे चांगलेच नाराज झाले होते. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र भाजपच्या भूमिकेत अचानक बदल झाला.
रवींद्र चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी नागपुरात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुका मिळून लढवण्याची घोषणा केली. यामुळे भाजप व शिवसेनेतील राजकीय कटूता दूर झाल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी सेना – भाजपच्या युतीवर नाव न घेता वरील शब्दांत निशाणा साधला आहे. यात त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्याचा उल्लेख अमित शहांचा पक्ष असा केला आहे. ठाकरे गटाकडून नेहमची शिंदेसेनेची हेटाळणी अमित शहांचा पक्ष म्हणून केली जाते. ते यासंदर्भाने बोलत होते.
काय म्हणाले असीम सरोदे?
अमित शहांच्या महाराष्ट्रातील पक्षाला भाजप सुद्धा टाळू शकत नाही. शेवटी अमित शहांच्या दट्यानंतर राज्यातील भाजपचे एक पाऊल मागे आणि महापालिका निवडणुकांसाठी अमित शहांच्या पक्षाबरोबर भाजपची युतीची घोषणा, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

भाजप – सेनेत जागावाटपाचा तिढा
दुसरीकडे, शिंदे – चव्हाणांच्या बैठकीत महापालिका निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचे ठरले असले तरी जागावाटपात अडचणी येत असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत महायुतीला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. महापौर कुणाचा? इतर पदांचे काय? या प्रश्नांचे उत्तर अद्याप मिळाले नाही. आज जे नगरसेवक ठाकरेंच्या सेनेकडे आहेत, त्या जागा शिंदे गटाला देण्यास भाजपचा विरोध आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत जिथे आमदार जिंकला ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला वापरला जात होता. पण यावेळी हा फॉर्म्युला वापरण्यास अडचण येत आहे.
भाजप – सेनेच्या युतीमुळे दोन्ही पक्षांत बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण डोंबिवलीच्या 131 जागांच्या पालिकेत भाजपला किमान 55-60 जागा हव्या आहेत. त्याला शिंदे गटाने विरोध दर्शवला आहे. त्यातच मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांनाही या प्रकरणी काही जागा सोडाव्या लागणार आहेत. यामुळेही भाजप व शिवसेनेत प्रश्नांचा डोंगर उभा राहिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी महायुतीत कोणता तोडगा निघतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.