![]()
कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने एका वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याचा प्रकार शनिवारी ता. 13 सकाळी उघडकीस आला आहे. यानंतर आता या परिसरात वन विभागाने दोन ट्रॅप कॅमेरे बसविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
.
कळमनुरी तालुक्यातील पोतरा-तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. या भागातील शेतकरी काशीराम मोदे यांच्या शेतातील दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्याचा प्रकार शुक्रवारी ता. 12 सकाळी उघडकीस आला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर शेतकरी व शेतमजूरांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पोतरा शिवारातच ज्ञानेश्वर पतंगे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये बैल, गायी व वासरू बांधले होते. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या शेतात जाऊन वासराचा फडशा पाडला. आज सकाळी पतंगे हे शेतात पाहणीसाठी गेले असतांना त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले. त्या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वन विभागाचे वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक सुधाकर कऱ्हाळे, खंडागळे, योगीता सहारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने आखाडयावरील जनावरांवर हल्ला केल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व पशुपालकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वन विभागाने दोन ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ज्या भागात बिबट्याचा वावर असेल त्या भागात शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कॅमेरे लावले जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. या शिवाय शेतकरी, शेतमजूरांनी कामावर जातांना गटाने जावे तसेच शेतात जागली साठी एकटे जाऊ नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.