‘ही’च मुंबईची खरी समस्या आहे हे शिंदेंना कसं कळणार? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल


Uddhav Thackeray Shivsena Slams DCM Eknath Shinde: “मुंबई महानगरपालिका निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील व आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे उपमुख्यमंत्री मिंधे यांनी घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. एका बाजूला मिंध्यांनी, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा करून पालिका निवडणुकांचे ‘शिंग’ फुंकले आहे. पुणे शहराच्या विविध प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री महोदयांनी 32,523 कोटींचा निधी मंजूर केला. पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी हा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला. निवडणुकांची तयारी अशा पद्धतीने सरकारी तिजोरीतून सुरू आहे. एका बाजूला मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. साडेसहा लाख शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित आहेत. त्यासाठी 5 हजार 975 कोटी निधीची आवश्यकता आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली जात आहेत. राज्यावर साधारण साडेनऊ लाख कोटींचे कर्ज मिंधे-फडणवीसांच्या सरकारने चढवून ठेवले. राज्यात आर्थिक आणीबाणी असल्याची कबुली मुख्यमंत्री देतात व दुसऱ्या बाजूला महापालिका निवडणुकांसाठी घोषणांचा पाऊस पाडतात. मुख्यमंत्री फडणवीस काहीतरी करतात, मग मिंधे मंडळ तरी कसे मागे राहील?” असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

Add Zee News as a Preferred Source

मराठी भूमिपुत्रांना किती व कसा फायदा होणार आहे?

“अमित शहांच्या पक्षाचे महाराष्ट्रातील ठेकेदार असलेले एकनाथ शिंदे यांनीही भरमसाट घोषणा करून निवडणुकांची हवा केली. मुंबई पागडीमुक्त करण्याची घोषणा सरकारने केली. मुंबईतील जुन्या पागडी तत्त्वावरील इमारतींचा योग्य आणि न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करून मुंबईला पागडीमुक्त करण्याची घोषणा मिंधे यांनी केली. त्यामुळे 19 हजारांपेक्षा जास्त पागडी तत्त्वावरील इमारतींना दिलासा मिळेल असे सांगण्यात आले. शिवाय गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचा विकास, पोलिसांना घरे, ‘ओसी’ म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना ‘अभय’ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. ‘ओसी’ नसलेल्या 20 हजार इमारती मुंबईत आहेत. महापालिका निवडणुकांची घोषणा पुढील 72 तासांत होत असताना या सर्व घोषणा झाल्या. या सगळ्याचा मूळ मुंबईकरांना म्हणजे मराठी भूमिपुत्रांना किती व कसा फायदा होणार आहे?” असा सवाल ‘सामना’मधून उपस्थित करण्यात आला आहे.

…तोपर्यंत मुंबईतील मराठी माणसाला सुखाने श्वास घेता येणार नाही

“खुद्द मिंध्यांच्या ठाणे जिह्यात ‘ओसी’ नसलेल्या अनेक इमारतींवर बुलडोझर चालवून शेकडो मराठी कुटुंबांना बेघर केले गेले. या मराठी माणसांचा आक्रोश कोणीच ऐकला नाही. आता मुंबईत ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना अभय दिले, पण ठाणे वगैरे जिह्यांतील भूमिपुत्रांना हा लाभ मिळणार नाही. मुंबईतील मतांवर डोळा ठेवून हे सर्व निर्णय घेतले गेले. ‘मुंबई पागडीमुक्त करू’ ही घोषणाही मराठी माणसांच्या फायद्याची दिसत नाही. त्यापेक्षा ‘मुंबई अदानीमुक्त करू’ ही योजना राबवायला हवी. अदानी म्हणजे मुंबईच्या छाताडावर आणि मानगुटीवर बसलेली पागडी आहे. मुंबईतील मोक्याच्या जागा अदानी यांनी ताब्यात घेतल्या. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईची लूट सुरू आहे व या लुटीस नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा पाठिंबा आहे. मिठी नदी सफाईचे फक्त 1300 कोटींचे कंत्राटही अदानी यांना हवे होते व ते त्यांना महापालिकेने दिले. अदानींची मुंबईवरील पागडी जोपर्यंत हटत नाही, तोपर्यंत मुंबईतील मराठी माणसाला सुखाने श्वास घेता येणार नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

…त्यामुळे मराठी माणसाने अति सावधान राहायला हवे

“मिंध्यांच्या घोषणा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू असा प्रकार आहे. पैशांचा वापर करून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत व लोकांना भुलवायला या अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडायचा हे एकंदरीत धोरण आहे. मुंबईची संपत्ती दिल्लीत ‘शहां’च्या चरणी अर्पण करायची व दुसऱ्या हाताचे मनगट तोंडावर ठेवून हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्त संघटना असल्याचा साक्षात्कार मिंध्यांना आता झाला, पण मिंधे ज्यांना गुरू मानतात त्या स्व. आनंद दिघे यांनी ठाण्यातून संघाच्या पूर्ण उच्चाटनाची मोहीम हाती घेऊन यशस्वी केली होती याचा मिंधे यांना विसर पडलेला दिसतो. मुंबई मराठी माणसांच्या ताब्यातून हिसकावून घेऊन शहांना नजराणा देण्याची योजना मिंधे वगैरे लोकांनी आखली आहे. त्यामुळे मराठी माणसाने अति सावधान राहायला हवे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

हीच मुंबईची खरी समस्या

“महाराष्ट्र मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाजपची योजना असून त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काम करीत असल्याचे सांगतात. स्वतःस ‘शिवसेना’ म्हणवून घेणारे शेंदाड शिपाई यावर तोंड शिवून बसतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंत्र्यांचा गळाच पकडायला हवा होता, पण सत्तेत बसलेले सगळेच आंडू, पांडू व गांडू महाराष्ट्राची अवहेलना बघत राहिले. मुंबईदेखील हिसकावण्याचे डावपेच खेळले जात आहेत व पागडीमुक्त मुंबईने प्रश्न सुटणार नाही. मुंबईतील हाऊसिंग सोसायटय़ांत मराठी माणसाला घर नाकारले जातेय. मीरा-भाईंदर, मुंबईत सोसायटय़ांवर मस्तवाल बिल्डरांनी बोर्ड टांगलेत, ‘मारवाडी-जैन यांनाच येथे घर मिळेल’. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे भाजप व संघवाले बोलतात. मराठी माणसाची अवस्था मिंधे-फडणवीस सरकारने पायपुसण्यासारखी केली व आता ‘पागडीमुक्त’ मुंबईचे मलम लावत आहेत. हा बनावटपणा आहे. मुंबईत मराठी माणसाला घर नाकारले जाते व शहा, अदानी, मिंधे, फडणवीस हे यामागचे सूत्रधार आहेत हीच मुंबईची खरी समस्या आहे. मिंधे, तुम्हाला हे कसे कळेल?” असा खोचक सवाल लेखाच्या शेवटी उपस्थित केला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *