स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांना मोठा दिलासा: आता ‘ऑफलाईन’ही अर्ज भरता येणार, राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय – Mumbai News


महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना पारंपरिकरीत्यादेखील ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे केले.

.

स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उमेदवार व राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेवून नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीनेदेखील दाखल करण्याची मूभा देण्यात आली होती. आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे दाखल करता येईल.त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन केले आहे.

संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांचे स्तरावर कार्यवाही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन) विकसित केली आहे. त्याद्वारे आणि घरोघरी जावून संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्याची दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे; तसेच ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲपदेखील विकसित केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी/ प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *