पुणे येथे सुरू असलेल्या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा तिसरा दिवस संतूरवादन आणि गायनाच्या मैफलीने रंगला. युवा संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी यांच्या बहारदार वादनानंतर पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्या दमदार गायनाने रसि
.
शुक्रवारी महोत्सवाच्या पूर्वार्धात सत्येंद्रसिंह सोलंकी यांनी आपल्या संतूर वादनाने रसिकांना आनंद दिला. पं. ओमप्रकाश चौरसिया यांचे शिष्य असलेल्या सत्येंद्रसिंह यांनी दाक्षिणात्य राग ‘वाचस्पती’ निवडला होता. आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन करताना त्यांनी पखवाजच्या साथीने रागाचा विस्तार केला. धृपद गायनाची तालीम घेतल्यामुळे त्यांच्या वादनाला धृपद गायकीचे एक वेगळे अंग लाभले होते.
त्यांनी तबल्याच्या साथीने तिस्र आणि चतुस्र जातीत वादन केले. त्यानंतर रूपक आणि त्रितालातील रचनांमधून लयकारीचे प्रभावी दर्शन घडवले. मिश्र पहाडीमधील एका आकर्षक धूनने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर रामेंद्रसिंह सोलंकी आणि पखवाजवर अखिलेश गुंदेचा यांनी उत्कृष्ट साथ दिली.
यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘पूरिया’ मध्ये एकतालातील ‘पिया गुणवंता’ आणि त्रितालातील ‘घडिया गिनत’ या रचनांचे दमदार सादरीकरण केले. त्यानंतर राग ‘सुहा कानडा’ मध्ये ‘ए दाता हो…’ ही झपतालातील रचना त्यांनी सादर केली, जी विशेष रंगतदार ठरली.
श्रीनिवास जोशी यांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा…’ या लोकप्रिय अभंग गायनाने मैफलीची सांगता केली. या अभंगाने संपूर्ण वातावरण भक्तीरसपूर्ण झाले. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार, हार्मोनिअमवर अविनाश दिघे, पखवाजवर गंभीर महाराज, गायनसाथीला विराज जोशी, टाळवर माऊली टाकळकर आणि तानपुऱ्यावर लक्ष्मण कोळी व मोबिन मिरजकर यांनी साथसंगत केली.
