![]()
मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यामुळे राज्यात ‘किंगमेकर’ ठरलेले मनोज जरांगे पाटील यांना आता थेट एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्व
.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या संघर्षामुळे हैदराबाद गॅझेट लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे म्हणाल्या, “मी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळीच जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले होते. मनोज जरांगे यांच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची आज महाराष्ट्रातील १८ पगड जातींना आणि सर्व समाजघटकांना गरज आहे. त्यामुळे त्यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि मी ते पद त्यांना द्यायला तयार आहे.”
गोपीनाथरावांचा खरा वारसा माझ्याकडेच!
यावेळी बोलताना करुणा मुंडे यांनी परळीच्या राजकारणावरही भाष्य केले. “धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे काय करत आहेत, हे जनता पाहत आहे. मात्र, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सायकलवरून फिरून ज्याप्रमाणे संघर्ष केला, तोच वारसा घेऊन मी एकटी महिला असूनही महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्यामुळे मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारसा माझ्याकडेच आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच वाल्मीक कराड प्रकरणामुळे आमच्या घराण्याची आणि कुळाची बदनामी झाल्याचेही त्यांनी म्हटले.
अजित पवारांना संपवण्यासाठी पार्थ पवारांचा वापर?
पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन घोटाळ्यावरून करुणा मुंडे यांनी भाजपबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. “भाजपनेच पार्थ पवार यांचा घोटाळा पुढे आणला आहे. इतकी वर्षे हा विषय गप्प का होता? निवडणुकीच्या वेळीच तो का बाहेर काढला? राष्ट्रवादीत अजित पवार यांचे खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने हा डाव टाकला आहे,” असे करुणा मुंडे म्हणाल्या.
“पार्थ पवारांना कोण वाचवतंय?
“पुढे बोलताना त्यांनी थेट सवाल केला की, “जर भाजपने घोटाळा उघडकीस आणला आहे, तर पार्थ पवार अजून जेलमध्ये का नाहीत? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून त्यांना वाचवले जात आहे का? कायदा सर्वांसाठी समान असायला हवा.”
भाजपवर ‘हुकूमशाही’चा आरोप
भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला. “उद्धव ठाकरे असो वा एकनाथ शिंदे, भाजपला या दोन्ही शिवसेना संपवायच्या आहेत. भाजप हा कोणाचाच पक्ष नाही, त्यांना केवळ हिटलरप्रमाणे हुकूमशाही गाजवायची आहे. देवेंद्र फडणवीस यांना हेच हवे आहे. पण तुम्ही आज सत्तेत आहात, उद्या दुसरे कोणीतरी असेल, याची जाणीव ठेवा,” असा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला.