Ravindra Chavan on Mahayuti: जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसंच महायुतीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. महायुती म्हणून निवडणुकांना सामोरं जाताना काही पद्धती विकसित करणं गरजेचं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर प्रमुख पालिकांमध्ये कोणत्याही स्थितीत युती व्हायलाच हवी असं मत सर्वांनी ठामपणे मांडलं असल्याचं रविंद्र चव्हाणांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसंच इतर प्रमुख पालिकांमध्ये समिती स्थापन करून युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्याचं ठरलं आहे अशी माहितीही दिली आहे.
“सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमची एक बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशाप्रकारे सामोरे गेलो, 20 तारखेला होणाऱ्या उर्वरित निवडणुका त्याबाबत रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीतच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबतही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी अशा सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्याआधी आमच्या कोअर टीमचीही सविस्तर बैठक झाली होती. या सगळ्यातून एक गोष्ट समोर आली की, महापालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता असून त्याबद्दल चर्चा झाली,” असं रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.
“जिल्हा परिषदेच्या निवडणुका आरक्षणाचा विषय हायकोर्टात सुरु आहे. कदाचित त्या थोड्य़ाशा लांबवल्या जातील. अशा स्थितीत 29 महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यात काय करावं, कशाप्रकारे पुढे जावं यासंदर्भात चर्चा झाली,” अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितलं की, “महायुती म्हणून निवडणुकांना सामोरं जाताना काही पद्धती विकसित करणं गरजेचं आहे हा मुद्दा चर्चेत आला. त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर प्रमुख पालिकांमध्ये कोणत्याही स्थितीत युती व्हायलाच हवी असं मत सर्वांनी ठामपणे मांडलं. तसंच इतर प्रमुख पालिकांमध्ये समिती स्थापन करून युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्याचं ठरलं आहे”.
“पुन्हा एकदा यासंदर्भात चर्चा करुन पुढे गेलं पाहिजे असं सांगितलं असल्याने एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी आमची बैठक झाली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने महायुती म्हणून पुढे जाण्याची दृष्टीने जाण्याचं ठरवलं आहे. कमिटी तयार करुन चाचपणी करावी असंही ठरलं. मुंबई, ठाणे अशा प्रमुख पालिकांमध्ये वरिष्ठ पातळीवर 100 टक्के युती करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
जागावाटप कसं असेल याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “29 महापालिकांमध्ये त्याठिकाणची परिस्थिती बदलते. पूर्वीच्या परिस्थितीत फरक आहे
म्हणून कमिटी केली जाईल. त्या कमिटी निर्णय प्रक्रिया सुरु करतील. मग अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. सर्व निर्णय हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार व प्रमुख नेते घेत असतात. तिघांना राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. विचार करून महाराष्ट्राला काय आवश्यक आहे याचा विचार करतात”.
“वैर शब्द राजकारणात असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. जनतेचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून शक्यतांचा विचार वरिष्ठ पातळीवर करण्याचा निर्णय झाला आहे,” असं त्यांनी नवी मुंबईत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातीव वैरसंदर्भात भाष्य करताना म्हटलं.
राष्ट्रवादीचा उल्लेख टाळण्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, “महायुतीत आरपीआय व अजित पवारपण आहेत. सर्वच जण महायुतीत येतात. त्यामुळे कमिटी केली जाईल त्यात सगळे जण असतील”.