काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, मोदींनीही व्यक्त केला शोक


Shivraj Patil Chakurkar Passes Away: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Passes Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरमधील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडं असा परिवार आहे. मागील अनेक दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते. राजकारणातील अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशी त्यांची ओळख होती. 

Add Zee News as a Preferred Source

12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्म झालेल्या शिवराज सिंग पाटील यांनी लातूर नगरपालिकेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी घेतली होती, तसंच मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतलं होतं. 1980 मध्ये ते सर्वात आधी लातूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले.  यानंतर त्यांनी सलग सातवेळी निवडणूक जिंकली होती. 

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा खात्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. ते लोकसभा अध्यक्षही राहिले. 

नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, “श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. ​गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांतीठ”.

महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे व्यक्तिमत्व  – देवेंद्र फडणवीस

“ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रात गृह, संरक्षण खात्याचे मंत्री, राज्यपाल अशा विविध भूमिकांमधून काम करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना चालना दिली. तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते. त्यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती,” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. 

शिवराज पाटील यांच्या निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपला – अशोकराव चव्हाण

लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.  शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, देशाचे एक व्यासंगी व कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राष्ट्रीय राजकारणात ते महाराष्ट्राचा एक चेहरा होते. त्यांनी आयुष्यभर सार्वजनिक प्रश्नांना अग्रक्रम दिला आणि देशसेवा केली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी अनेक दूरदर्शी धोरणे अवलंबली. त्या धोरणांचा प्रभाव व सकारात्मक परिणाम आजही दिसून येतो. राजकारण, समाजकारण व प्रशासनात त्यांनी दिलेले योगदान चिरंतर राहिल.

शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन माझ्यासाठी मोठी वैयक्तिक हानी आहे. डॉ. शंकरराव चव्हाण व त्यांचे बंधुत्वाचे नाते होते. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबात आत्मियतेचे संबंध राहिले आहेत. सार्वजनिक कार्यात त्यांनी मला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *